नवी दिल्ली,दि.१२: राष्ट्रवादीचे ((SP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे कौतुक केले आहे. नवी दिल्ली होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात पवार बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे, आयुष मंत्री प्रताप जाधव, संजय नहार उपस्थित होते.
काय म्हणाले शरद पवार?
अलिकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदे यांचे नाव घ्यावे लागेल. ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून योग्य दिशा देण्याचे काम शिंदे यांनी केले, त्यांनी कधीही पक्षीय अभिनिवेश मनात न ठेवता सर्व पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली. याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चित होईल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री दिले. मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झंझीभाई होते. त्यानंतरच्या काळात यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच नांदवळ गावचे शरद पवार देखील याच यादीत येतात, असे पवार म्हणाले. ठाणे, नवी मुंबई, मुंबई या नागरी भाग आहे. ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष सावळाराम पाटील, रांगणेकर यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांचेही आवर्जून नाव घ्यावे लागेल, असे पवार म्हणाले. साताऱ्याचेच कवी सावळाराम पाटील हे ठाण्याचे नगराध्यक्ष होते. पाटील यांना ठाण्याचे नगराध्यक्ष करण्याचा किस्सा पवार यांनी यावेळी सांगितला.