दि.23: “बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, त्यांचं लिखाण माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे.
डॉ.श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचार प्रवाह ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास छत्रपती शाहू महाराज, माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील उपस्थित होते.
तसेच, “जे काही लिखाण त्यांनी केलं, जी काही मांडणी त्यांनी केली. ती मांडणी ज्याला सत्यावर विश्वास आहे तो घटक कधीही मान्य करणार नाही. नाही त्या व्यक्तींचं महत्व वाढवण्यासाठी त्याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. रामदासाचं योगदान काय? दादोजी कोंडदेवाचं योगदान काय? या सगळ्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. पण एक गोष्ट चांगली झाली. की, महाराष्ट्र सरकारने एका काळात उत्तम खेळाडूंना दादोजी कोंडदेव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यावर वाद-विवाद झाले आणि २००८ मध्ये राज्य सरकारने दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक, गुरू होते का नाही, याचा सखोल अभ्यास करण्याचे काम समितीवर सोपवले.
त्या समितीने सखोल अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला, की दादोजी कोंडदेव व शिवछत्रपतींचा काहीच संबंध नव्हता. शिवाजी महाराजांना जर कोणी दिशा दिली असेल, तर ती राजमाता जिजाऊंनी दिली आहे. यानंतर दादोजी कोंडदेव हा पुरस्कार काढण्यात आला.”
याचबरोबर, “अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही, त्या सत्य जरी असल्या तरी त्या अनेकांना न पटण्या सारख्या आहेत. पण माझ्यामते श्रीमंत कोकाटे यांनी हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले आहे. सर्व गोष्टींचे वास्तव चित्र त्यांनी दर्शवलं आहे. शिवछत्रपतींचा उल्लेख करताना काही जणांनी धर्मांध चित्र रंगवण्याचा, संकुचित चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.पण श्रीमंत कोकाटेंनी सत्य मांडले आहे. अशाच प्रकारचे काम कॉ. गोविंद पानसरेंनी देखील केलं आहे.” असंही पवार म्हणाले.