Senthil Balaji Arrested: मनी लाँडरिंग प्रकरणी तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांना अटक

0

चेन्नई,दि.14: Senthil Balaji Arrested: डीएमके नेते आणि तामिळनाडूचे ऊर्जामंत्री वी सेंथिल बालाजी (V. Senthil Balaji) यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर बुधवारी त्यांना अटक करण्यात आली. ईडीच्या कारवाईदरम्यान सेंथिल बालाजी यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्यांना ओमंडुरार येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सेंथिल बालाजी यांच्या चेन्नई येथे असलेल्या घराशिवाय त्यांच्या करूर येथील वडिलोपार्जित घरावरही छापे टाकण्यात आले.

Senthil Balaji Arrested

त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी चेन्नईतील एका सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तेव्हा मंत्री सेंथिल बालाजी यांना रडू कोसळलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तामिळानाडुचे आरोग्यमंत्री एम सुब्रमण्यन आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टालीन यांनी चेन्नईच्या सरकारी रुग्णालयात जाऊन सेंथिल बालाजी यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना स्टालिन यांनी सांगितलं की, सेंथिल बालाजी यांच्यावर उपचार सुरू आहेत. आम्ही या प्रकरणी कायद्याची मदत घेऊ. भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारच्या धमकीच्या राजकारणाने आम्ही घाबरणार नाही.

डीएमके नेते सेंथील बालाजी यांचे वकील एनआर एलंगो यांनी सांगितलं की, सेथिल बालाजी यांना आयसीयुत हलवण्यात आलं आहे. डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत. एखादी व्यक्ती सांगत असेल की त्याला मारहाण झालीय तर डॉक्टरांनी सर्व दुखापतींची माहिती घेऊन त्याची नोंद ठेवली पाहिजे. आम्हाला अहवाल आल्यानंतर दुखापतीची माहिती समजू शकेल. अद्याप ईडीने सेंथिल यांच्या अटकेची माहिती दिलेली नाही.

नोकरीसाठी पैसे घेतल्याचा घोटाळा प्रकऱणी सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आणि ईडीला चौकशीची परवानगी दिली होती. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ईडीने कायद्यानुसार मंत्र्यांच्या निवासस्थानी छापा टाकला. गेल्या महिन्यात आयकर विभागाने सेंथिल बालाजी यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी छापे टाकले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here