मुंबई,दि.१९: पाकिस्तानी पत्रकार आरजू काजिमी यांनी खळबळजनक दावा केला आहे. भारताचा मोस्ट वाँटेड कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला यावर सोशल मीडियात गेल्या २ दिवसांपासून बरीच चर्चा सुरू आहे. दाऊदवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याची बातमी समोर आली त्यानंतर पुन्हा एकदा भारतात दाऊदचा विषय चर्चेत आला. आता दाऊदबाबत पाकिस्तानी महिला पत्रकार आरजू काजिमी यांनी खळबळजनक दावा केला आहे.
पत्रकार आरजू काजिमी म्हणाल्या की, जगाच्या नजरेत देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी पाकिस्तान असं करू शकतो, ज्यात दाऊद इब्राहिमला मारण्याचाही एक भाग आहे. आयएमएफ असो वा वर्ल्ड बँक सर्वांचा पाकिस्तानवर दबाव आहे. मागील काही काळात पाकिस्तानात अनेक टार्गेट किलिंग झालेत. परंतु आता लोक विचारायला लागलेत. अखेर दहशतवादी संघटना चालवणारे त्यांचे प्रमुख कधी मारले जाणार. जगच नव्हे तर पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र चीननेही पाकिस्तानात असे लोक नसायला हवेत असं म्हटलं. त्यामुळे पाकिस्तान स्वत: दाऊद इब्राहिमसारख्या लोकांना त्यांच्या वाटेतून दूर करत असण्याची शक्यता आहे.
तसेच दाऊद पाकिस्तानात आहे हे येथील सरकार स्वीकार करत नाही. कारण तो आजही भारतीय नागरिक म्हणून ओळखला जातो. पाकिस्तान अशा गोष्टी बाहेर येऊ देण्याची रिस्क घेणार नाही. परंतु जेव्हा कधीही काही घडते तेव्हा दाऊद पाकिस्तानातच आहे हे पुढे येते. जर दाऊद इब्राहिम इथं मारला गेला असेल किंवा आजाराने त्याचा मृत्यू झाला असेल तरीही पाकिस्तान हे कधीही समोर येऊ देणार नाही. कारण हे पाकिस्तानाला परवडणारे नसेल असंही पत्रकार आरजू काजिमी यांनी म्हटलं.
कराचीतील क्लिफ्टन परिसरात दाऊद इब्राहिमचं वास्तव्य आहे. दाऊदच्या ठिकाणापासून ८ किमी असलेल्या कराचीतील आगा खान हॉस्पिटलमध्ये तो उपचारासाठी दाखल असल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. दाऊदने भारतीय सुरक्षा यंत्रणांपासून लपण्यासाठी स्वत:ची नावे बदलली आहे. वेगवेगळ्या २५ नावाने तो राहत असून २० बनावट पासपोर्टही त्याने तयार केले. ज्यामुळे तो आरामात जगातील कुठल्याही कोपऱ्यात जाऊ शकतो. पाकिस्तानात त्याची इतकी ठिकाणे आहेत की, अखेर तो कुठे आहे हे सांगणेही कठीण होईल.
दाऊद जिवंत असल्याचा दावा
दाऊदचा खास हस्तक छोटा शकील याने ‘दाऊद जिवंत आणि ठणठणीत असून, मी त्याला रविवारी दिवसभरात अनेकदा भेटलो’ असा दावा केला आहे.दाऊद रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर छोटा शकील याने भारतीय वृत्तवाहिनीशी बोलताना याचे खंडन केले. त्याची तब्येत उत्तम आहे, तसेच रविवारी दिवसभरात काही वेळा आपली व दाऊदची भेट झाल्याचा दावाही त्याने केला.