सोलापूर,दि.२४: शाळेत जाऊन कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी चव्हाण अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. यात हकीकत अशी की, दिनांक १२/१२/२०२१ रोजी संशयीत नामे विलास वसंत गरड, ज्ञानेश्वर विलास गरड, परमेश्वर विलास गरड व उत्तरेश्वर विलास गरड सर्व रा. रानमसले ता. उत्तर सोलापूर यांनी रानमसले येथील शाळा तसेच वसतीगृहामध्ये बेकायदेशीररित्या घुसखोरी करुन कर्मचाऱ्यास अश्लिल शिवीगाळी करुन तेथील शालेय उपयोगी साहित्याची मोडतोड करुन कर्मचाऱ्यास मारहाण केली अशा आशयाची फिर्याद फिर्यादी ब्रम्हदेव उद्धव गरड यांनी तालुका पोलीस स्टेशन येथे दिली.
त्यामुळे अटक होण्याच्या भितीपोटी सदरील संशयीतांनी ॲड. अभिजीत ईटकर यांचेमार्फत अटकपूर्व जामीनाचा अर्ज सत्र न्यायालय, सोलापूर यांच्याकडे दाखल केला. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी ॲड. अभिजित ईटकर यांनी असा युक्तिवाद केला की, सदर शाळेचे संस्थापक व संशयीत यांच्यामध्ये सदर शाळेच्या जागेबद्दल अनेक दिवाणी दावे सोलापूर येथील न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे सदर संस्थापकाचे ऐकून सदरील फिर्यादी याने सदरची फिर्याद दाखल केल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी सदर संशयीतांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला केला. यावेळी सदर संशयीतांतर्फे ॲड. अभिजीत ईटकर, ॲड. शिरीष पवार, ॲड. युवराज आवताडे, ॲड. संतोष आवळे, ॲड. राम शिंदे यांनी काम पाहिले.