Sanjay Shirsat: आमदार संजय शिरसाट यांची कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी

0

मुंबई,दि.13: आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे. संजय शिरसाट (Sanjay Shirsat) शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा आहे. काल रात्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एक ट्वीट केलं. ज्यात  ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. या ट्विटची वादळी चर्चा सुरु होताच शिरसाट यांनी ट्विटचा खुलासा केला आहे. राजकारणात सगळ्यांना पुढे जायचे असते. त्यामुळं मंत्री व्हावे ही माझी इच्छा असल्याचे मत शिंदे गटाचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी व्यक्त केले.

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच (CM Eknath Shinde) आहे आणि त्यांच्यासोबच राहणार असल्याचे शिरसाट म्हणाले. काल गेलेली पोस्ट चुकून गेली होती. माझ्या मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळं ती पोस्ट गेल्याचा खुलासा शिरसाट यांनी केला. दरम्यान, ठाकरे कुटुंबाबद्दल अपशब्द निघणार नाही, हीच आमची भूमिक आहे. मात्र, टीका केली तर उत्तर मिळणार असल्याचेही शिरसाट यावेळी म्हणाले. मी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे. मला औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावे अशी मागणी केल्याचंही शिरसाट यांनी सांगितले.

औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदेंच्या गटाचा झेंडा खांद्यावर घेतला. मात्र सुरुवातीपासून शिंदे गटात सामील होऊनही शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं नाही. अशातच काल रात्री संजय शिरसाट यांनी एक ट्वीट केलं होतं. ज्यात ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. टि्वट सोबतचं विधानसभेतलं उद्धव ठाकरेंचं एक भाषण देखील त्यांनी जोडलं होतं. मात्र, काही वेळातचं त्यांनी हे ट्वीट डिलीट देखील केलं. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना अशी आता चर्चा सुरु झाली आहे. मंत्रीपद मिळालं नसल्याने शिरसाट नाराज असल्याची चर्चा देखील सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

मी कधीही कुठेही दबावतंत्राचा वापर केला नाही. मी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे. पालकमंत्रीपद द्यावे अशी मागणी देखील मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याचेही शिरसाट यावेळी म्हणाले. मात्र, याबाबत अंतिम निर्णय हा एकनाथ शिंदे घेतील असेही शिरसाट यावेळी म्हणाले. पुढच्या मंत्रीमंडळ विस्तार मला संधी मिळणार असल्याचा शब्द दिला असल्याचेही ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here