अजित पवार, भुजबळ आणि मुश्रीफ यांच्यावर संजय राऊत यांचा गंभीर आरोप

0

मुंबई,दि.7: ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अजित पवार, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. महादेव बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तकाने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणावरुन छत्तीसगडमधील राजकीय वातावरण तापलं आहे.

संबंधित प्रकरणावर देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आपल्या भाषणात या प्रकरणावरुन भाजपला टोला लगावला होता. “भूपेश बघेल भाजपात गेले तर महादेव बेटिंग अ‍ॅपचं हरहर महादेव होईल”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर लगेच आज दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर महाराष्ट्रातील तीन मोठ्या सत्ताधारी नेत्यांबाबत गंभीर दावा केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे महादेव बेटिंग अ‍ॅपचे सदस्य आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. भाजप त्यांना तुरुंगात टाकणार होतं. पण आता पुजा करत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

काय म्हणाले संजय राऊत?

“भूपेश बघेल भाजपमध्ये सहभागी झाले तर त्यांना तिथे देवाचं स्थान दिलं जाईल. त्यांच्यावर हरहर महादेव म्हणत अभिषेक केला जाईल. महाराष्ट्रात अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ हे देखील महादेव अ‍ॅपचेच सदस्य आहेत ना? त्यांची पुजा केली जाते. त्यांना जेलमध्ये पाठवायचं होतं. आता त्यांची पुजा केली जातेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्यावर फुलं उधळत आहेत”, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.

हे अनाड्यांचं सरकार

राज्यात नुकतंच ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. त्यापोठापाठ अजित पवार यांच्या पक्षाला सर्वाधिक यश आलंय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झालाय. या निवडणुकीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

“मुख्यमंत्री काय बोलतात याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. ग्रामपंचायत निवडणुकांनंतर फटाके घटनाबाह्य सरकार वाजवते ते फुसके आहेत. निकालाचे आकडे प्रत्येक जण आपापल्या बाजूने दाखवत आहे. आम्ही कसे जिंकलो आणि विरोधक कसे हरले हे दाखवत आहेत. हा एक मूर्खपणा आहे. या निवडणुका पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत, हे जर घटनाबाह्य सरकारला माहीत नसेल तर हे अनाड्यांचं सरकार आहे असं म्हणावं लागेल. हे अनाडी घोडे उधळले आहेत”, अशी टीका संजय राऊतांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here