संजय राऊत यांचे महाविकास आघाडीबद्दल मोठं वक्तव्य

0

मुंबई,दि.23: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाविकास आघाडीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन राऊत यांनी दिले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारले आहे.

‘वर्षा’ निवासस्थानात आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे आमदार कैलाश पाटील आणि नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांनी सूरतमधून कशी सुटका केली, याबाबत अनुभव मांडले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, बाहेर असलेल्या शिवसेना आमदारांना जर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा असे वाटत असेल तर तोदेखील विचार करू. मात्र, तुम्ही आधी 24 तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करावी असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, पत्रकारांना व इतरांना व्हॉट्सॲपवर हॉटेलमधील फोटो, व्हिडिओ पाठवण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन चर्चा करावी. आमचा गुवाहाटीमधील 21 आमदारांसोबत संपर्क झाला असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली. राऊत यांनी म्हटले की, राज्याबाहेर गेलेले शिवसेनेचे 20-25 आमदार पुन्हा शिवसेनेत येतील असा विश्वास आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी इच्छा असेल तर तुम्ही प्रत्यक्षात भेटून चर्चा करावी. मात्र, त्यांचा हा बहाणा असल्याचे राऊत यांनी म्हटले. सरकारमधून बाहेर पडावे असं त्यांना वाटत असते तर त्यांनी प्रत्यक्षात चर्चा केली असती, असेही राऊत यांनी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here