मुंबई,दि.२८: Sanjay Raut On Supreme Court: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर मोठं वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला कसे मिळतात? आम्हाला दिलासे कसे मिळत नाहीत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांची फाईल दाबून ठेवली हा घटनेचा भंग नाही का? यावर कोण का बोलत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. १२ आमदारांचं निलंबन आणि १२ सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती न होणं ही दोन्ही प्रकरणे वेगळी नाहीत. विधीमंडळाचाच विषय आहे. लोकशाहीच्या हक्काचा, आमदारांच्या अधिकाराचाच प्रश्न आहे, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्र सरकारला झटका दिला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारला सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) झटका, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. आमदारांचे निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी पद्धतीने करण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे.
तालिका अध्यक्षांशी असंसदीय वर्तन केल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले होते. निलंबनाच्या या कारवाईविरोधात सर्व १२ आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, अशा प्रकारचे निर्णय, दिलासे एकाच राजकीय पक्षाला का मिळतात? न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाच्या बाजूने का असतात? राज्यपालांनी १२ आमदारांची फाईल दाबून ठेवली हा घटनेचा भंग नाही का? यावर कोणी का बोलत नाही? हा गंभीर विषय आहे. या १२ आमदारांचेही काही अधिकार आहेत. निर्णय घेण्यासाठी किती वेळ लागतो?. आज दोन वर्ष झाली, असे सांगतानाच तुम्ही कोणाच्या दबावाखाली काम करत आहात का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.