Sanjay Raut: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतीनां पत्र लिहून केला खळबळजनक दावा

0

मुंबई,दि.९: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक दावा केला आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून मोठा दावा केला आहे. आपल्या राज्य सरकार पाडण्यासाठी दबाव असल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी मंगळवारी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवून खळबळजनक दावा केला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मदत करण्यास नकार दिल्यानंतर ईडीने त्यांच्यासह कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी हे आता काही राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. त्यांना त्यांच्या ‘बॉस’कडून मला वठणीवर आणण्यास सांगण्यात आले आहे, अशी कबुलीही संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्राद्वारे अनेक खळबळजनक दावे केले आहेत. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांसाठी मदत करण्यास नकार केल्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्याची धमकीही देण्यात आली, असा दावा त्यांनी केला आहे. राऊत यांनी ‘सत्यमेव जयते’ अशी कॅप्शन देत पत्राच्या प्रती ट्विट केल्या आहेत. ‘जवळपास एका महिन्यापूर्वी काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत करावी असे सांगितले. सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यात मी महत्वाची भूमिका पार पाडावी, कारण राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतील,’ असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.



अशा कोणत्याही प्रकारच्या गुप्त अजेंड्याचा भाग होण्यास नकार दिल्यानंतर मला धमकावण्यात आले. तुम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकीही मला देण्यात आली. इतकंच नाही तर, तुमचे यापुढील दिवस हे एका माजी रेल्वेमंत्र्यांसारखे होऊ शकतात, ज्यांनी अनेक वर्षे तुरुंगात घालवली आहेत, असंही धमकावण्यात आल्याचं संजय राऊत यांनी पत्रात नमूद केलं आहे.

दोन नेत्यांनाही तुरुंगात टाकण्याची धमकी

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या पत्रात अनेक दावे केले आहेत. माझ्यासह महाराष्ट्र मंत्रिमंडळातील दोन ज्येष्ठ मंत्र्यांसह महाराष्ट्रातील दोन वरिष्ठ नेत्यांवर पीएमएलए कायद्यांतर्गत कारवाई करून तुरुंगात टाकण्यात येईल, अशी धमकीही मला देण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. असे केल्याने राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होतील, असेही राऊत यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here