सोलापूर,दि.3: राज्यात मुंबईसह 29 महापालिका करिता 15 जानेवारीला मतदान होणार आहे तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र राज्यातील अनेक महापालिकेत सत्ताधारी पक्षातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 66 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. अटलबिहारी वाजपेयी तसेच नरेंद्र मोदी यांनाही लोकांनी कधी बिनविरोध निवडून दिले नाही मग या 66 लोकांचे असे काय कर्तृत्व आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कधीही घडले नाही, इतक्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा धक्कादायक प्रकार सध्या सुरू आहे. हा निव्वळ पैशांचा खेळ आणि सत्तेचा गैरवापर असून निवडणूक आयोग या भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचे पाळीव मांजर बनले आहे.’
राऊत यांनी दावा केला की, उमेदवारांना माघार घेण्यासाठी प्रचंड मोठी आर्थिक आमिषे दाखवली जात आहेत. ते म्हणाले, “अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी किंवा वसंतदादा पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही कधी लोकांनी बिनविरोध निवडून दिले नाही. मग या 66 लोकांचे असे काय कर्तृत्व आहे? जळगावमधील उमेदवाराला माघार घेण्यासाठी 5-5 कोटींच्या बॅगा घरपोच केल्या गेल्या. कल्याणमध्ये मनसेच्या नेत्याला दिलेला आकडा तर डोळे पांढरे करणारा आहे. ही निवडणूक नसून पैशांचा बाजार मांडला आहे.”








