‘कुटुंबातील व्यक्तीसाठी एसआयटी स्थापन कली जाते पण…’ संजय राऊत

0

मुंबई,दि.२१: शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. गेल्या तीन दिवसांपासून संजय राऊतांच्या एका ट्वीटची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या ट्वीटप्रकरणी संजय राऊतांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांकडून या ट्वीटवर असंवेदनशील असल्याची टीका केली जात आहे. पण संजय राऊत मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून आपण काहीही गैर केलेलं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊतांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली आहे. तसेच, राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

काय आहे प्रकरण?

संजय राऊतांनी तीन दिवसांपूर्वी एका मुलीचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या मुलीवर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यावरून मोठी चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. “देवेंद्रजी, हे चित्र बार्शीतलं आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का? ५ मार्चला हल्ला झाला आहे. पण आरोपी मोकाट आहेत”, असं ट्वीट संजय राऊतांनी या फोटोसह केलं होतं.

दरम्यान, संजय राऊतांच्या या ट्वीटवर सत्ताधाऱ्यांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला. पाठोपाठ बार्शीमध्ये अल्पवयीन पीडितेची ओळख जाहीर केल्याप्रकरणी संजय राऊतांवर गुन्हाही दाखल झाला. यावरून राऊत टीकेच्या केंद्रस्थानी असतानाच त्यांनी आज माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बार्शीतल्या काही गुंड टोळ्यांनी तिच्यावर निर्घृणपणे

“मी काय चुकलो? या मुलीवर कोयत्याचे वार झाले आहेत, या मुलीची आई माझ्याशी बोलली, तिच्या आईनं आक्रोश करत सरकारकडे ‘जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही, तर मला इच्छामरणाची परवानगी द्या’ अशी मागणी केली आहे. पारधी समाजातली ही मुलगी आहे. बार्शीतल्या काही गुंड टोळ्यांनी तिच्यावर निर्घृणपणे हल्ला केला. अजूनही काही मुख्य आरोपी बाहेर आहेत. जर मी दिल्लीत असताना मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवायचा असेल तर मी ज्या माध्यमातून पोहोचवायला हवा, त्या माध्यमातून पोहोचवला आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

कुटुंबातील व्यक्तीसाठी एसआयटी स्थापन कली जाते पण

“मी त्या मुलीचं नाव, तिच्यावर झालेल्या अत्याचारांविषयी काहीही बोललेलो नाही. फक्त ‘माननीय मुख्यमंत्री या मुलीचं सांडलेलं रक्त वाया जाऊ देऊ नका’ इतकंच म्हटलं. यावर जर माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल, तर राज्यातला कायदा कोणत्या पद्धतीने काम करतोय, हे स्पष्ट दिसेल. आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी एसआयटी स्थापन कली जाते. एका चुंबन प्रकरणाच्या व्हिडीओवरून एसआयटी स्थापन केली जाते. पण मी एका रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका मुलीचा फोटो ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतो. एका खासदारावर, एका पत्रकारावर गुन्हा दाखल होतो. या राज्याची कायदा-सुव्यवस्था कशी काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय ते यातून स्पष्ट दिसतंय”, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीकास्र सोडलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here