मुंबई,दि.१४: Sanjay Raut: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेचा हा मंत्री जेलमध्ये जाणार, तो मंत्री जेलमध्ये जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांच्या बाजूच्या कोठड्या सॅनिटाईज करुन ठेवाव्यात, असे भाजपचे नेते म्हणत आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत भाजपमधीलच ‘साडेतीन’ लोकं हे अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख (Anil Deshmukh) हे बाहेर असतील, असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं, आता आम्ही आरोप करणाऱ्यांना उद्ध्वस्त करु. राज्यात आमचं सरकार आहे आणि त्याचं नेतृत्त्व शिवसेनेकडे आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावं, असेही संजय राऊत यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात दुपारी चार वाजता आपण पत्रकारपरिषद घेऊ, असे सांगितले. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं उर्जाकेंद्र आहे. उद्याच्या पत्रकारपरिषदेला शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदार हजर असतील. त्यावेळी आम्ही काय बोलू, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले असेल. या पत्रकारपरिषदेत आमच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांना आम्ही प्रत्युत्तर देऊ. भाजपचे नेते हा नेता जेलमध्ये जाईल, तो नेता अनिल देशमुख यांच्या बाजूच्या कोठडीत असेल, असे म्हणत आहेत.
पण पुढच्या काही दिवसांमध्ये भाजपचे ‘साडेतीन लोकं’ हे अनिल देशमुख यांच्याच कोठडीत असतील आणि देशमुख हे बाहेर असतील, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला. त्यामुळे आता शिवसेना भवनातील पत्रकारपरिषदेत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. भाजपचे नेते आम्हाला धमक्या देतात काय? हमाम मे सब नंगे होते है. मी काय बोलतोय, हे भाजप नेत्यांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची झोप उडाली आहे. आता त्यांनी जे उखाडायचं आहे, ते उखाडा, असेही संजय राऊत यांनी म्हटले.