मुंबई,दि.9: Dagadi Chawl 2: डॉन अरुण गवळी (Arun Gawali) यांच्यावर आधारित मराठी चित्रपट दगडी चाळ (Dagadi Chawl) सुपरहिट झाला. त्यानंतर दगडी चाळ 2 चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘मंगलमूर्ती फिल्म्स’ आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ ची सध्या जोरदार चर्चा आहे. ‘दगडी चाळ’ मध्ये ‘डॅडीं’चा विश्वासू सूर्या ‘दगडी चाळ 2’मध्ये अचानक त्यांचा तिरस्कार करु लागला आहे आणि याचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. अशात आता आणखी एका खास कारणाने हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. ‘दगडी चाळ 2’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढत असताना प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खानने देखील या चित्रपटासाठी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे.
डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी.. या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचं नाव.. अरुण गुलाब गवळी (Arun Gawli) उर्फ डॅडी (Daddy). बाकीचे सगळे डॉन देशाबाहेर पळून गेले, मात्र तो मुंबईतच राहून आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिन हूड म्हणून ओळख झाली. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या ‘दगडी चाळ’मधील ‘चुकीला माफी नाही’ असं म्हणणाऱ्या अरुण गवळी यांचा दबदबा सर्वांनीच अनुभवला.
‘दगडी चाळ 2’ चित्रपटातील ‘राघू पिंजऱ्यात आला’ हे धम्माल गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यातून बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह हिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यामुळे या चित्रपटाची एकंदरच सर्वत्र हवा आहे. आता तर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान यानेही सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.
सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर डेझी शाहचं ‘राघू पिंजऱ्यात आला’ हे गाणं शेअर केलं आहे. यासोबत त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, “दगडी चाळ 2 च्या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा” सलमान खानच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा असून अभिनेत्री डेझी शाहने या पोस्टवर कमेंट करत सलमानचे आभार मानले आहेत.
दरम्यान डॅडी आणि सूर्याचे नाते आपण ‘दगडी चाळ’ मध्ये यापूर्वीच पाहिले आहे. नॉलेजचा वापर करून सूर्या अल्पावधीतच डॅडींचा उजवा हात बनतो. पण ‘दगडी चाळ 2’ मध्ये असे काय घडले? सूर्या डॅडींचा इतका राग राग करताना दिसतोय? तर याची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळाणार आहेत. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत दिसणार असून येत्या 19 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.