सोलापूर,दि.20: Saamana Rokhthok | आठ वर्षांपासून भाजपचे राज्य केंद्रात आहे, पण सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करून माफीचा डाग धुऊन काढावा असे ढोंगी सावरकर भक्तांना वाटत नाही’ असं म्हणत संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक (Saamana Rokhthok) सदरातून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी सावरकर यांनी जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका होण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली होती, असे वक्तव्य केलं होतं. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळत होती असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते.
’10 वर्षांपेक्षा जास्त काळ अंदमानात नरकयातना (देशासाठी) भोगल्यावर सावरकरांनी ‘डावपेच’ म्हणून दिलगिरी व्यक्त करून सुटकेचा मार्ग निवडला असेल तर त्यास शरणागती-माफीनामा म्हणता येणार नाही. असे सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसंच, पंतप्रधान मोदी नेहरूंच्या बदनामीची भूमिका सोडत नाहीत. राहुल गांधींनी सावरकरांना त्याच कारणासाठी पकडले, हा देशाचा अजेंडा नाही. अशाने भारत कसा जोडणार? असा टोलाही राऊत यांनी राहुल गांधींना लगावला.
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात विधान केल्यामुळे राज्यात वादंग निर्माण झाला आहे. याच मुद्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून राहुल गांधींना सल्ला दिला तर भाजपवरही निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी वादळ ओढवून घेतले
‘वीर सावरकरांवर नाहक टीका करून राहुल गांधी यांनी वादळ ओढवून घेतले. ‘भारत जोडो’ यात्रेचा तो अजेंडा नव्हता. भारतीय जनता पक्ष सावरकरांच्या अपमानाविरुद्ध रस्त्यावर उतरला. सावरकरप्रेमाचे हे ढोंगच म्हणावे लागेल. संघ सावरकरांचा कठोर टीकाकार राहिला, पण आज राजकीय स्वार्थासाठी भाजप सावरकरवादी झाला. सावरकरांनी 10 वर्षे अंदमानच्या काळ्या पाण्यावर नरकयातना भोगल्या. त्या देशासाठीच होत्या याचा विसर पडू नये’ असा सल्ला राऊत यांनी राहुल गांधींना दिला.
तुम्ही वारंवार लोकांच्या श्रद्धांना असे का डिवचता
‘तुम्ही वारंवार लोकांच्या श्रद्धांना असे का डिवचता व भाजपला विषयांतर करण्यासाठी हत्यार का देता? मी स्वतः तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात होतो. या तुरुंगातही अनेक स्वातंत्र्यवीरांचा मुक्काम 1947 पर्यंत होता. त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ एक स्तंभही ऑर्थर रोड तुरुंगात आहे. एक सामान्य बंदी म्हणून तुरुंगात दिवस काढणेही कठीण असते. वीर सावरकरांनी तर अंदमानात 10 वर्षांपेक्षा जास्त काळ घालवला. बेहिशेबी संपत्तीच्या खटल्यात किंवा मनीलाँडरिंग प्रकरणाचा खोटा गुन्हा लादून ब्रिटिशांनी त्यांना अटक केली नव्हती. भारतमातेच्या पायातील पारतंत्र्याच्या बेडय़ा तोडण्यासाठी त्यांनी सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवली. त्यासाठी त्यांना अंदमानचे काळे पाणी भोगावे लागले’ अशा शब्दांत राऊत यांनी राहुल गांधींची समजूत काढली.
तुरुंगातून सुटण्यासाठी तात्या एक चाल खेळत होते
‘तात्यांनी वेळोवेळी केलेले अर्ज, त्यामागचा त्या वेळचा राजकीय संदर्भ, तसेच इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यासंबंधी व्यक्त केलेली प्रतिक्रिया समग्र लक्षात घेतली तर तुरुंगातून सुटण्यासाठी तात्या एक चाल खेळत होते हे लक्षात येते. पन्नास वर्षे अंदमानच्या अंधारात कुजत राहून जीवितयात्रा संपविण्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेऊन सशर्त किंवा बिनशर्त मुक्त होण्यासाठी ते अंदमानातून प्रयत्न करीत होते. म्हणूनच सुटकेला उपकारक अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली असे वाटले की सुटकेसाठी ते अर्ज करीत असत. या व्यावहारिक धोरणाला यश यावे म्हणून ते सरकारला अनेक आश्वासने देत आणि सहकार्याचे आमिष दाखवीत असत. 1937 पर्यंत ते हा खेळ खेळत होते. सावरकर व त्यांच्या बंधूंची अंदमानातून सुटका व्हावी यासाठी गांधींचे अनुयायी आग्रही होते. खुद्द महात्मा गांधींनी ‘यंग इंडिया’च्या 26 मे 1920 च्या अंकात सावरकर बंधूंची सरकारने सुटका करावी, असे आग्रहाने प्रतिपादन केले आहे. बॅ. जमनादास मेहता यांच्या अध्यक्षतेखाली सावरकर मुक्तता समिती स्थापन करण्यात आली होती. 1923 च्या कोकोनाड येथे भरलेल्या काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातही सावरकरांच्या सुटकेबाबतचा ठराव मंजूर केला’ असंही राऊत म्हणाले.
डावपेच म्हणून दिलगिरी व्यक्त करून सुटकेचा मार्ग निवडला असेल
‘अटकेत असलेला कोणताही बंदी त्याच्या सुटकेसाठी हरतऱहेचे कायदेशीर प्रयत्न करीत असतो. 10 वर्षांपेक्षा जास्त काळ अंदमानात नरकयातना (देशासाठी) भोगल्यावर सावरकरांनी ‘डावपेच’ म्हणून दिलगिरी व्यक्त करून सुटकेचा मार्ग निवडला असेल तर त्यास शरणागती-माफीनामा म्हणता येणार नाही. आज ‘ईडी’सारख्या स्वतंत्र हिंदुस्थानातील तपास यंत्रणांच्या भयाने भले भले एका रात्रीत ‘स्वदेशी’ सरकारला शरण जातात. पक्ष बदलतात. स्वतःच्या निष्ठा विलीन करतात. सावरकरांनी दशकभर अंदमानात ज्या यातना सहन केल्या त्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ने जी सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास निर्माण केला त्यावर सावरकरांवरील भाष्याने पाणी पडले.’
पंतप्रधान मोदी यांनी जवाहरलाल नेहरूंना लक्ष्य केले, तर राहुल गांधी वीर सावरकरांना लक्ष्य करीत आहेत. स्वातंत्र्य लढय़ात दोघांचे योगदान तोलामोलाचे आहे. सावरकरांनी तर सर्व सुखांचा त्याग करून अंदमानचा मार्ग स्वीकारला. पुन्हा तुरुंग काय असतो याची कल्पना नसलेले सावरकरांच्या सुटकेवर बोलतात तेव्हा आश्चर्य वाटते. सावरकरांचे वंशज एरवी कोठे दिसत नाहीत. राहुल गांधींनी सावरकरांवर वक्तव्य केले की त्यांचा चेहरा वृत्तवाहिन्यांवर दिसतो. आठ वर्षांपासून भाजपचे राज्य केंद्रात आहे, पण सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करून माफीचा डाग धुऊन काढावा असे ढोंगी सावरकर भक्तांना वाटत नाही’ असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.