Saamana On Modi: काजोलने अंधभक्तांच्या डोळ्यांत ज्ञानाचे काजळ घातले खरे, पण तरीही भक्त…

0

मुंबई,दि.११: Saamana On Modi: दैनिक सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर आणि भाजपा समर्थकांवर टीका केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री काजोलने काही दिवसांपूर्वी राजकीय भाष्य केलं होतं. “देश चालवणाऱ्या अनेक नेत्यांकडे दूरदृष्टीचा अभाव आहे. शिक्षणामुळेच तुमच्यात दूरदृष्टी येते”, असं ती म्हणाली होती. परंतु तिच्या या वाक्यावरून तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं. इतकं ट्रोल केलं गेलं की तिला तिच्या वक्तव्याबाबत नंतर स्पष्टीकरणही द्यावं लागलं. या प्रकरणावरून ठाकेर गटाने केंद्र सरकारवर आणि भाजपा समर्थकांवर टीका केली आहे.

देशाचे सध्याचे राजकारण म्हणजे… | Saamana On Modi

“देशाचे सध्याचे राजकारण म्हणजे अडाण्यांचा गाडा झाला आहे व त्यावरच अभिनेत्री काजोलने आपले परखड मत व्यक्त केले. शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले राजकारणी देश चालवत आहेत, असे काजोलने म्हटले. आपल्या देशातील अंधभक्तांनी यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अंधभक्तांनी असा समज करून घेतला की, काजोलने सध्याच्या दिल्ली सरकारवर आपले मत व्यक्त केले व त्यांनी काजोलला नेहमीप्रमाणे ‘ट्रोल’ करण्यास सुरुवात केली.”

“आपल्या देशातील एक उच्चशिक्षित कलाकार लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगते व तसे केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या ‘ट्रोल धाडी’ त्या अभिनेत्रीवर तुटून पडतात. देशात वैचारिक बदलांची प्रक्रिया खूपच संथगतीने सुरू आहे. कारण शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले राजकारणी देश चालवत आहेत, असे काजोलने सांगितले. काजोलचे मत हे अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे”, असं ठाकरे गटाने त्यांचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं.

चौथी पास राजाचे अंधभक्त… | Saamana On Modi

“ती म्हणते, ”आपण अजूनही परंपरा आणि जुन्या विचारधारेत अडकून पडलो आहोत. याचे कारण अर्थातच शिक्षणाचा अभाव हेच आहे. देश चालवणाऱ्या अनेक नेत्यांकडे दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. शिक्षणामुळेच तुमच्यात दूरदृष्टी येते. विविध दृष्टिकोनातून पाहण्याची संधी तुम्हाला शिक्षणामुळेच मिळते’, असे काजोलने सांगितले. यात तिचे काय चुकले? पण चौथी पास राजाचे अंधभक्त, समर्थक काजोलवर तुटून पडले. काजोल महाराष्ट्रकन्या असल्याने परखडपणा तिच्या स्वभावात असणारच. पुन्हा शिक्षणासंदर्भात विचार देणारे महात्मा फुले याच मातीतले. महात्मा फुले यांनी शिक्षणाचा पुरस्कार केला. ते सांगतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले! महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी लोकांना शहाणे व शिक्षित करण्यासाठी शर्थ केली. त्याच सावित्रीची लेक काजोल शिक्षणाची महती सांगत आहे. काजोलने शिक्षणाचे महत्त्व सांगितले, ते नेमके कुणाला व का झोंबले? तिने तर कुणाचेच नाव घेतले नव्हते”, असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

“देशातील विकास, शिक्षण, लोकशाही यावर तिला मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, ”शिका व संघर्ष करा.” अज्ञान हे घातक असते. अज्ञानातून अंधश्रद्धा व अंधभक्तांची पैदास वाढते. भारत देश सध्या या अंधारातून प्रवास करीत आहे. अंधभक्तांना काजोलचे वक्तव्य झोंबले. कारण त्यांच्यासमोर त्यांचे विश्वगुरू पंतप्रधान मोदींचे चित्र व चरित्र आहे. पंतप्रधान मोदी हे गुजरातमधील एका प्लॅटफॉर्मवर चहा विकत होते, पण ते ज्या गावात चहा विकत होते असे सांगतात, त्या गावात तेव्हा रेल्वेही नव्हती तर प्लॅटफॉर्म तरी कसा असेल? प्रश्न चहा विकणारा पंतप्रधान झाला हा नाही, तर पंतप्रधान त्यांची शैक्षणिक अर्हता लपवीत आहेत. आपण उच्चविद्याविभूषित आहोत, हे दाखविण्यासाठी मोदी यांच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांनी एक बनावट ‘डिग्री सर्टिफिकेट’ जाहीर केले. पंतप्रधानांना शेवटी त्यांची डिग्री लपवून ठेवावी लागली व सर्वत्र त्यांचे हसे झाले”, असा प्रहारही सामनातून करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here