76 मुस्लिमांच्या छातीवर गोळ्या चालवल्या गेल्या होत्या, एकाच्याही पाठीवर…

0

सोलापूर,दि.१४: नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. अनेक पालिकेत भाजपचा महापौर झाला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने १०२ जागांपैकी ८७ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. परभणी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा (ठाकरे गट) महापौर निवडून आला आहे. येथे मुस्लिम समाजातील नगरसेवकाला शिवसेनेने महापौर केल्याने भाजपाने शिवसेनेवर टीका केली. यावर दैनिक सामनाच्या अग्रलेखात भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. 

दैनिक सामना अग्रलेख 

खरे म्हणजे महाराष्ट्रात मराठीचा झेंडा फडकवण्याचे काम इतर प्रांतीय व धर्मीय करीत असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे, परंतु स्वतःच्या पक्षात फायद्यासाठी औरंगजेब, अफझलखान, जयचंद घ्यायचे व दुसऱ्यांकडे बोटे दाखवायची, हेच भाजपवाल्यांचे धंदे आहेत. जालियनवाला बाग घडले तेव्हा 76 मुस्लिमांच्या छातीवर गोळ्या चालवल्या गेल्या होत्या. एकाच्याही पाठीवर गोळी लागली नव्हती. हा होता स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचा सहभाग. ज्यांनी आयुष्यभर थडगी आणि कबरीचे राजकारण केले त्यांना ही राष्ट्रभक्ती काय समजणार? परभणीत सय्यद इक्बाल महापौर झाले हा राष्ट्रवादाचा गौरव आहे. ‘जगात जर्मनी आणि देशात परभणी’ म्हणतात ते यासाठीच!

महाराष्ट्रात अनेक प्रश्नांचे तांडव सुरू असताना भारतीय जनता पक्ष व त्यांचे लाचार मंडळ परभणीत शिवसेनेने मुसलमान महापौर दिला म्हणून बांगबाजी आणि भांगबाजी करीत आहे. ही त्यांच्या नसलेल्या अकलेची दिवाळखोरी आहे. काय तर म्हणे परभणीत ‘खाना’ला बसवून दाखविले! हा प्रकार म्हणजे स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्यांचे पाहावे वाकून असा आहे. अरे बाबांनो, परभणीच्या खानाचे ठेवा बाजूला, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यात तुम्ही मंचावर ‘खाना’ला का बसवून दाखविले त्याचा खुलासा आधी करा. सरसंघचालकांच्या मांडीवर खानाला बसवलेले चालते, पण परभणीचा मराठी भाषिक कडवट शिवसैनिक असलेला देशभक्त खान यांना चालत नाही.

1965 च्या भारत-पाक युद्धात ज्या अर्शद खानने पठाणकोटवर बॉम्बहल्ले केले, त्या अर्शद खानचा मुलगा अदनान सामीही ‘संघ’चालकांच्या खांद्यावर विराजमान झाल्याचे चित्र देशाने पाहिले, पण सय्यद इक्बाल या मराठी भाषिक शिवसेना पदाधिकाऱ्याची महापौरपदी निवड होताच भाजपने हिंदू-मुसलमान झगडा सुरू केला. सरसंघचालकांनी शताब्दी वर्ष सोहळ्यातच यावर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणतात ‘‘हिंदू-मुस्लिम ऐक्याबद्दल वारंवार बोलले जाते. मात्र हे पूर्णतः चुकीचे आहे. कारण आम्ही हिंदू आणि मुस्लिम यांना वेगळे मानतच नाही.’’ भागवत पुढे म्हणतात ते महत्त्वाचे…‘‘जे मुस्लिम येथील प्रथा, परंपरा, रूढी आणि संस्कृती आपली मानतात, ते आपलेच आहेत. त्या सर्वांना आपले मानले पाहिजे.’’ हे जर सरसंघचालकांचे मार्गदर्शन असेल तर मग भाजपमधील ही पिलावळ हिंदू-मुसलमानांच्या नावाने ‘बांगगिरी’ का करत आहे? सरसंघचालकांचे विचार त्यांना मान्य नाहीत काय? देशाच्या जडणघडणीत व त्याआधी स्वातंत्र्य लढ्यात मुसलमानांचा सहभाग मोठा आहे. मुसलमान क्रांतिकारकांनी असंख्य बलिदाने दिली, तर आज सत्तेवर बसलेल्या भाजपवाल्यांच्या अंगावर स्वातंत्र्य लढ्यात साधा ओरखडाही उठला नाही, पण तरीही हे लोक हिंदुत्वाचे आणि राष्ट्रभक्तीचे स्वयंघोषित ठेकेदार बनले आहेत.

भारतातील हिंदूंची डोकी भडकवण्याचे काम भाजप करीत आहे. अमेरिकेत एक टक्का हिंदू आहेत. ते सगळे सुरक्षित आहेत. इंग्लंडमध्ये दीड टक्का हिंदूही सुरक्षित आहेत. ऑस्ट्रेलियात तीन टक्के हिंदू सुरक्षित आहेत. अरब राष्ट्रांतील सहा टक्के हिंदूंनाही कसली भीती नाही, पण भारतावर भाजपचे राज्य येताच देशातल्या 85 टक्के हिंदूंना म्हणे धोका निर्माण झालाय. वास्तविक, हिंदूंना खरा धोका हा भाजपपासूनच आहे. ज्यांचा देव ‘मोदी’ आहे त्याच हिंदूंना धोका आहे असे दिसते. बाकी सगळे हिंदू सुरक्षित आहेत. कारण भाजपवाल्यांसाठी हिंदुत्व धर्म नसून राजकीय धंदा बनला आहे. आता यांच्या ढोंगबाजीची उदाहरणे तरी किती द्यावीत? पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाले तेव्हा आम्ही किती निधर्मी आहोत हे जगाला दाखवण्यासाठी मोदी सरकारने कर्नल सोफिया कुरेशीला पुढे केले व युद्धाची दैनंदिन माहिती तिच्यामार्फत दिली, पण ‘सिंदूर’ मागे घेताच भाजपवाल्यांनी सोफियाला ‘देशद्रोह्यांची बहीण’ ठरवले. भाजपची स्थापना ज्या सात प्रमुख नेत्यांनी केली, त्यातले एक सिकंदर बख्त होते हे आजच्या पिलावळीस माहीत नसेल आणि त्यांचेच आराध्य दैवत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे प. बंगालमधील मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात चवऱ्या ढाळीत होते.

‘चले जाव’ चळवळ मोडून काढा, असा इंग्रज सरकारला सल्ला देणारे हेच श्यामाप्रसाद मुखर्जी होते. गृहमंत्री अमित शहा सांगत होते, ‘‘पाकव्याप्त कश्मीर भारतात आणण्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ.’’ काय झाले त्यांच्या प्राणांचे? योगी आदित्यनाथ निवडणूक प्रचारात शंख फुकत होते की, ‘‘भाजपचे सरकार बनले तर सहा महिन्यांत पाकव्याप्त कश्मीरला भारतात विलीन करू.’’ राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले की, ‘कोणत्याही परिस्थितीत ‘पीओके’वर भारत ताबा मिळवेल.’ पंतप्रधान मोदी पाकिस्तानशी लढण्यासाठी स्वतःच्या 56 इंची छातीचा हवाला देत होते, पण ‘ऑपरेशन सिंदूर’ अर्धवट सोडून प्रे. ट्रम्प यांच्या धमक्यांना ते का बळी पडले? असे हे दुबळे लोक राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाच्या पोकळ गप्पा मारतात याचे आश्चर्य वाटते.

परभणीच्या महापौरपदी सय्यद इक्बाल विराजमान झाले, हे त्यांच्या निष्ठेचे फळ आहे. बेइमान-गद्दारांना भाजपकडून नजराणा मिळतो. परभणी जिल्ह्यात भाजपचेही 12 मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत आणि जिंतूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपद भाजपने मेहमुन्निसा पठाण या मुस्लिम महिलेला दिले आहे, त्याचे काय? म्हणजे तुम्ही असे केले तर चालते, पण इतरांनी केले तर तुम्ही हिंदू विरुद्ध मुसलमान असे भांडण लावणार. देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश मुस्लिम होऊ शकतात. भाजपनेच ही पदे बहाल केली, पण परभणीतल्या देशभक्त मराठी भाषिक सय्यदला मात्र ते विरोध करतात. हे ढोंग आहे. भाजपच्या लोकांचे स्वातंत्र्य लढा आणि राष्ट्रवादाशी वैर आहे. खरे म्हणजे महाराष्ट्रात मराठीचा झेंडा फडकवण्याचे काम इतर प्रांतीय व धर्मीय करीत असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे, परंतु स्वतःच्या पक्षात फायद्यासाठी औरंगजेब, अफझलखान, जयचंद घ्यायचे व दुसऱ्यांकडे बोटे दाखवायची, हेच भाजपवाल्यांचे धंदे आहेत.

इराणसारख्या मुस्लिम राष्ट्राने प्रे. ट्रम्प यांच्यापुढे शरणागती पत्करण्यास नकार दिला, पण ‘बटेंगे तो कटेंगे’वाल्यांचे विश्वगुरू मात्र प्रे. ट्रम्प यांच्यापुढे गुडघे टेकताना जगाने पाहिले. हे तर औरंगजेबापेक्षा भयंकर आहे. जालियनवाला बाग घडले तेव्हा खान अब्दुल गफार खान म्हणाले होते, ‘‘जर कोणी मुस्लिमांच्या पाठीवर लागलेली गोळी दाखवली तर मी स्वातंत्र्य लढ्यातून बाजूला होईन.’’ पाच दिवस पोस्टमार्टेम सुरू होते. 76 मुस्लिमांच्या छातीवर गोळ्या चालवल्या गेल्या होत्या. एकाच्याही पाठीवर गोळी लागली नव्हती. हा होता स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचा सहभाग. ज्यांनी आयुष्यभर थडगी आणि कबरीचे राजकारण केले त्यांना ही राष्ट्रभक्ती काय समजणार? परभणीत सय्यद इक्बाल महापौर झाले हा राष्ट्रवादाचा गौरव आहे. ‘जगात जर्मनी आणि देशात परभणी’ म्हणतात ते यासाठीच!


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here