Saamana: सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी सुनावणी सुरू आहे व न्याय मेला नाही हे लवकरच कळेल

0

मुंबई,दि.२: Saamana: सामना अग्रलेखातून ठाकरे गटाकडून सविस्तर भूमिका स्पष्ट करण्यात आली असून शिंदे गटाला लक्ष्य करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यापासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. या सुनावणीमध्ये पहिले तीन दिवस ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला असून आता शिंदे गटाचे वकील नीरज कौल युक्तिवाद करत आहेत. आज सुनावणी पूर्ण करण्याचं सर्वोच्च न्यायालयाचं नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

न्यायासाठी सुनावणी सुरू आहे व न्याय मेला नाही हे लवकरच कळेल

“विधिमंडळात तुमच्याकडे बहुमत आहे याचा अर्थ तुम्ही म्हणजे पक्ष होत नाही”, असं विधान न्या. चंद्रचूड यांनी केले आहे. विधिमंडळातील फक्त चाळीस आमदार म्हणजेच शिवसेना, असा निर्णय निवडणूक आयोगातील ईस्ट इंडिया कंपनीच्या एजंटांनी दिला काय आणि या विकतच्या बहुमतवाल्यांनी नाचायलाच सुरुवात केली, पण कितीही नाचकाम केले तरी सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी सुनावणी सुरू आहे व न्याय मेला नाही हे लवकरच कळेल”, असा विश्वास अग्रलेखात व्यक्त करण्यात आला आहे.

“निकालाची पर्वा आम्हाला नाही, पण संविधान, सत्य व जनतेचा आवाज मारला जाऊ नये यासाठी हा लढा आहे! घर म्हणजे चार भिंती नाहीत. शिवसेना म्हणजे विधिमंडळ नाही. निकाल हाच आहे!” असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

बच्चूभाईंचा चेहरा पाहण्यासारखा…

“दिवसाढवळ्या चाळीस चोरांनी शिवसेनेवर दरोडा टाकला. चाळीस जणांची चोरांची टोळी हा ‘चोरबाजार’ होऊ शकतो, पण चोरबाजार म्हणजे शिवसेना हे कसे घडेल? चोरांना रस्त्यावर अडवून जनता जागोजागी जाब विचारीत आहे. मिंधे गटाच्या भजनी लागलेले आमदार बच्चू कडू हे धाराशीव जिल्हय़ात एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथील लोकांनी, आबालवृद्धांनी त्यांना घेरावच घातला. “चोर-डाकूंसोबत तुम्ही गेलात कसे? लाजलज्जा गुंडाळून ठेवलीत काय?” असा जाब विचारून लोक त्यांची गाडी अडवू लागले तेव्हा बच्चूभाईंचा आंबट चेहरा पाहण्यासारखा झाला होता. सर्वच चाळीस आमदारांवर जागोजागी हीच वेळ आली. कारण शिवसेना जनतेत आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटाकडून टीकास्र सोडण्यात आलं आहे.

तेव्हा काय करणार?…

“विचारांचे रोपटे शिवसेनाप्रमुखांनी लावले तेव्हा विधिमंडळ, लोकसभा, विधिमंडळ पक्ष काय तो अस्तित्वात नव्हते. आमदार-खासदार काय तर नगरसेवकही नव्हते. त्यामुळे विधिमंडळातील फुटीर आमदारांचा ‘चोर गट’ म्हणजेच शिवसेना हा निर्णय बकवास आहे. न्या. चंद्रचूड यांनी तेच सांगितले. विधिमंडळ पक्ष प्रत्येक निवडणुकीनुसार बदलत असतो. आजचा ‘चोर गट’ उद्या विधिमंडळात नसेल. मग निवडणूक आयोगाच्या आजच्या निर्णयाचे काय? शिंदे गटात स्वबळावर काही करण्याची कुवत नाहीच. हिंमतदेखील नाही. रस्त्यांवरील ‘कुंड्या’ आलिशान गाडीत चोरून न्याव्यात त्याप्रमाणे निवडणूक आयोगाबाहेर दिमाखदार गाड्या लावून त्यांनी धनुष्यबाण व शिवसेना चोरून नेली”, अशा शब्दांत ठाकरे गटानं शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here