Saamana | “कमरेवर वीतभर टॉवेल सोडला तर मंत्रीमहोदय संपूर्ण उघडेबंब…”

0
फोटो: दैनिक सामना

सोलापूर,दि.२१: Saamana Article On Bharat Gogawale | शिवसेना (शिंदे गट) नेते मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा करतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. एखाद्या मंत्र्याने अघोरी पूजा करतानाचे फोटो प्रथमच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. यावरून शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. दैनिक सामनाने अग्रलेखात गोगावले व शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. (Saamana Article)

दैनिक सामना अग्रलेख जसाच्या तसा | Saamana Article On Bharat Gogawale

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कधी नव्हे ते लिंबू, मिरच्या, टाचण्या, कवट्या यांना महत्त्व आले. हे मिंधे यांचे कर्तृत्व. त्याच मिंधे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेस गाडण्याची भाषा पुन्हा केली आहे. ज्यांचे मीठ खाऊन या पदास ते पोहोचले त्यांनाच गाडण्याची भाषा हे करतात. अधःपतनाची सगळ्यात खालची पातळी गाठल्याचे हे उदाहरण आहे. मिंधे यांचे स्वतःचे असे काहीच नाही. पक्ष चोरलेला, बाप चोरलेला, अमित शहांचे नेतृत्वदेखील भाड्याचे, राजकारणात आणलेला पैसाही चोरीचा. विचार असा नाहीच. त्यामुळे स्वतःच्या बेइमानीस प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी अघोरी थयथयाट होणारच. त्यांनी तो करत राहायलाच हवा. त्यातून मऱ्हाठी जनतेला सत्य दर्शन होत राहते.

Saamana Article On Bharat Gogawale

महाराष्ट्राच्या राजकारणातील अघोरी विद्येचे जनक एकनाथ मिंधे यांनी त्यांच्या गटाच्या तिसऱ्या वर्धापनदिनी भाषण केले. भाषण मुडद्यांसमोर केले. मुडदेही रोजंदारीवर विकत आणले होते. अघोरी विद्या आणि मुडद्यांचा संबंध असल्याने त्यांनी मुडद्यांत प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. मंचावरील उपस्थित काही सांगाडय़ांनी गाडलेले मुडदे उकरण्याचा प्रयोग केला. दोन दिवसांपूर्वी मिंधे गटातले एक मंत्री गोगावले यांचे अघोरी पूजा करतानाचे ‘चित्रण’ महाराष्ट्रासमोर आले आहे. या चित्रणात कमरेवर वीतभर टॉवेल सोडला तर मंत्रीमहोदय संपूर्ण उघडेबंब बसले आहेत. आजूबाजूला मानवी कवटी, हाडे, लिंबू, मिरच्या व पूजापाठ करणारे अघोरी बाबा बसले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राचे ज्यांनी हे असे स्मशान आणि कब्रस्तान केले ते मिंधे लोक त्यांच्या रोजच्या जीवनातही मारण्या-मरण्याच्या गोष्टी करत असतील तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या बेइमानांना आव्हान दिले की, ‘‘तुम्ही शिवसेना संपवायचं स्वप्न पाहिलंत तरी ते पूर्ण होणे शक्य नाही. शिवसेना आणि ठाकरे ब्रॅण्ड या लोकांना संपवता येणार नाही. मी ठामपणे लढायला उभा आहे. हिंमत असेल तर माझ्यावर चाल करून या, पण येताना ऍम्ब्युलन्स घेऊन या.’’ ही आव्हानाची भाषा सर्वच महाराष्ट्रद्रोह्यांसाठी होती. यावर सगळय़ात जास्त बुडाला आग लागली ती मिंधे यांच्या. मिंधे म्हणाले, ‘‘मेलेल्यांना मारून काय मिळणार? ते आधीच मेले आहेत.’’ एकनाथ मिंधे यांची ही मरण्या-मारण्याची भाषा म्हणजे त्यांच्या सध्याच्या मानसिक अवस्थेचे दर्शन आहे. फडणवीस मंत्रिमंडळात त्यांची जी अवस्था झाली, त्यामुळे आलेले हे वैफल्य आहे. त्या वैफल्याच्या भरात त्यांनी केलेली बकवास महाराष्ट्रात कोणीच गांभीर्याने घेणार नाही.

या गटाच्या मंत्र्यांना अद्यापि स्वतःचे ‘पीए’ नेमता आले नाहीत. एमएमआरडीएमधील तीन हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच हाणून पाडले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी यांच्या भ्रष्टाचाराच्या नाड्या घट्ट आवळून शिस्तीचा पोकळ बांबू घातल्याने ‘एसंशिं’ गटाची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी झाली. फडणवीस यांची तक्रार करण्यासाठी रात्रीच्या अंधारात ते दिल्लीत जातात. अमित शहांचे जोडे कवटाळून परत येतात. असे हे लोक स्वाभिमानाच्या, मराठी स्वाभिमानाच्या इरसाल बाता करतात तेव्हा गंमत वाटते. ‘‘हिंदुत्वासाठी आपण ‘काय पन’ करायला तयार असल्याचे’’ हे महाशय म्हणाले. मुंबईच्या मराठी माणसासाठीसुद्धा ते ‘काय पन’ करायला तयार आहेत. ‘‘प्रसंगी सत्ताही सोडू’’ अशी थुंकी त्यांनी उडवली.

खरं तर या मंडळींना स्वतःचा पक्ष नाही. शिवसेना हा पक्ष चिन्हासह चोरून अमित शहांनी त्यांना दिला हे सत्य कोणी नाकारू शकेल काय? यांच्या गटाचे ‘बाप’ अमित शहा आहेत व अमित शहा हेच महाराष्ट्राचे दुश्मन क्रमांक एक आहेत. महाराष्ट्र व मराठी बाणा मारून शहा वगैरे लोकांना मुंबईवर व्यापाऱ्यांचे राज्य आणायचे आहे. या मधल्या व्यवहारात मिंधेंचा उपयोग कवडीच्या दलालासारखा झाला. त्यामुळे मराठी माणसाच्या कल्याणासाठी हे काय सत्तात्याग करणार? गौतम अदानी, लोढा, कंबोज या बिल्डरांना बळ देऊन धारावीसह मुंबईतून मराठी माणसाला बाहेर फेकण्याचा ‘मेगा प्लॅन’ अमित शहा, फडणवीस वगैरे लोकांनी बनवला आहे. या व्यवहारातील शेकडो कोटींची दलाली मिंध्यांच्या तोंडावर फेकली की, मिंध्यांचा बाणा आणि कणा मोडून पडेल. नव्हे, हे अवयव त्यांच्या शरीरात आता उरलेलेच नाहीत. 

त्यांच्या डोळ्यांदेखत मंत्रिमंडळात मुंबई विकण्याचा सौदा सुरू आहे व हे महाशय लाचारासारखे त्यास मान्यता देत आहेत. हिंदुत्वाची तर बातच नाही. 26 भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानशी युद्ध थांबवणाऱ्या मोदींना तुमचे ते नकली हिंदुत्वाचे प्रवचन ऐकवा. महिलांचे ‘सिंदूर’ पुसणाऱ्या अतिरेक्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही आणि प्रे. ट्रम्प यांचा फोन येताच मोदी पाकिस्तानबरोबर युद्धविराम करून बसले. असल्या डरपोकांच्या हाती देश आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या नावाने सुरू असलेल्या वल्गना कुचकामी आहेत. 

महाराष्ट्राची तिजोरी लुटणे व लाचारीचा कळस गाठून दिल्लीची हुजरेगिरी करणे हेच या मिंध्यांचे काम बनले आहे. पुन्हा विरंगुळा म्हणून ‘अघोरी’ विद्येचे बलप्रयोग सुरूच आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणास स्मशानकळा आणण्याचे श्रेय या महाशयांना नक्कीच द्यावे लागेल. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कधी नव्हे ते लिंबू, मिरच्या, टाचण्या, कवटय़ा यांना महत्त्व आले. हे मिंधे यांचे कर्तृत्व. त्याच मिंधे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेस गाडण्याची भाषा पुन्हा केली आहे. ज्यांचे मीठ खाऊन या पदास ते पोहोचले त्यांनाच गाडण्याची भाषा हे करतात. अधःपतनाची सगळ्यात खालची पातळी गाठल्याचे हे उदाहरण आहे. मिंधे यांचे स्वतःचे असे काहीच नाही. पक्ष चोरलेला, बाप चोरलेला, अमित शहांचे नेतृत्वदेखील भाडय़ाचे, राजकारणात आणलेला पैसाही चोरीचा. विचार असा नाहीच. त्यामुळे स्वतःच्या बेइमानीस प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी अघोरी थयथयाट होणारच. त्यांनी तो करत राहायलाच हवा. त्यातून मऱ्हाठी जनतेला सत्य दर्शन होत राहते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here