एकनाथ शिंदे गटात ऋतुजा लटके प्रवेश करणार, सुषमा अंधारे म्हणाल्या

0

मुंबई,दि.१३: एकनाथ शिंदे गटात ऋतुजा लटके (Rutuja Latke) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीत ऋतुजा लटके या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार आहेत. ऋतुजा लटके या दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी आहेत. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आहेत. कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्याला निवडणूक लढवायची असेल तर राजीनामा द्यावा लागतो. लटके यांनी सप्टेंबर महिन्यात हा राजीनामा दिला, पण त्यांचा हा राजीनामा स्वीकारला गेला नाही.

अशी एकंदरीत स्थिती असताना ऋतुजा लटके यांना शिंदे गटात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. शिवाय ऋतुजा लटके यांनी स्वत: पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे ऋतुजा लटके शिंदे गटात सामील होणार का? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.

याबाबत प्रश्न विचारला असता ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर तीन दिवसांपूर्वी ऋतुजा लटके मातोश्रीवरही आल्या होत्या. त्यांनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत लढणार असल्याचं सांगितलं आहे. शिवाय शिंदे गटात जाण्याची आपली मानसिकता नाही, असंही ऋतुजा लटके म्हणाल्या असल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे. त्या ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

ऋतुजा लटके शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “तीन दिवसांपूर्वी ऋतुजा लटके मातोश्रीवर आल्या होत्या. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांना शिंदे गटाकडून ऑफर दिली जात आहे. दिवंगत आमदार रमेश लटके यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आर्थिक व्यवहार होते. यातूनच त्यांच्यावर शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव टाकला जात आहे, अशी माहिती ऋतुजा लटके यांनी स्वत: दिली असल्याचं सुषमा अंधारेंनी सांगितलं.

यानंतर तुमची शिंदे गटात जाण्याची मानसिकता आहे का? असं विचारलं असता ऋतुजा लटके यांनी ‘नाही’ असं उत्तर दिल्याचंही अंधारेंनी सांगितलं. माझे पती (दिवंगत आमदार रमेश लटके) प्रामाणिकपणे तुमच्यासोबत थांबले असते, त्यांच्या शब्दाखातर मी ही लढाई उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत लढणार आहे, असं ऋतुजा लटके म्हटल्याची माहितीही सुषमा अंधारेंनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here