दि.24: Russia Ukraine War: युक्रेनवर (Ukraine) रशियन (Russia) हल्ल्यांदरम्यान, युक्रेनने दावा केला आहे की त्यांनी पाच रशियन विमान-हेलिकॉप्टर पाडल्या आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. त्याच वेळी, रशियाच्या (Russia) संरक्षण मंत्रालयाने त्याचा इन्कार केला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की त्यांनी युक्रेनचे (Ukraine) हवाई तळ आणि हवाई संरक्षण यंत्रणा आपल्या अचूक शस्त्रांनी नष्ट केली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून गुरुवारी एक निवेदन जारी करण्यात आले, ज्यात म्हटले आहे की रशियन सैन्य युक्रेनच्या लष्करी पायाभूत सुविधा अचूक शस्त्रांनी नष्ट करत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी सकाळी युक्रेनविरोधात लष्करी कारवाईची घोषणा केली.
रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. अहवालानुसार, रशियाच्या हल्ल्यात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 9 लोक जखमी झाले आहेत. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर रशियाचे सैन्यदल आता युक्रेनमध्ये घुसले असून रणगाड्यांसह हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अहवालानुसार, युक्रेनमधील मारियुपोल शहरात अनेक रणगाडे घुसले आहेत. विमानतळाजवळून धूर निघत असल्याचेही वृत्त आहे. युक्रेनच्या इतर शहरांमध्येही विमानतळावर हल्ले झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
रशियाने युक्रेनची राजधानी कीववरदेखील हल्ला केला. डोन्बास प्रांतावर हल्ला करण्यासह युक्रेनच्या राजधानीवर हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली. रशियाच्या हल्ल्याचा युक्रेनच्या सैन्याने प्रतिकार सुरू केला आहे. दरम्यान, युक्रेनच्या सैन्यानेही रशियन हवाई दलाला झटका दिला आहे. रशियाची पाच विमाने पाडली असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. युक्रेनने नागरी विमानांसाठी हवाई वाहतूक बंद केली आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर कीवमध्ये गोंधळाची स्थिती आहे. शहर सोडून जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांग रांगासह मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
सोव्हिएत महासंघाचा भाग होता युक्रेन
युक्रेन हा देश 1990 पर्यंत सोव्हिएत महासंघाचा भाग होता. सोव्हिएत महासंघाचे विघटन झाल्यानंतर युक्रेन स्वतंत्र झाला. युक्रेनच्या वाट्याला सोव्हिएत महासंघाच्या काळात विकसित करण्यात आलेले महत्त्वाचे बंदर, लष्करी विभाग आले. स्वतंत्र्यानंतर युक्रेनचे रशियासोबत चांगले संबंध होते. वर्ष 2014 पर्यंत व्हिक्टर यानुकोविच राष्ट्रपतीपदावरून हटण्याआधी रशियासोबत चांगले संबंध होते. मात्र, त्यांच्या पश्चात आलेल्या सरकारने रशियाविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे युक्रेनमधील रशियन भाषिक प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली असल्याचा आरोप करण्यात आला.
रशियाने युक्रेनच्या डोन्बास प्रांतावरच हल्ला का केला?
युक्रेन पूर्वमधील डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) हे प्रांत रशियाने स्वतंत्र देश म्हणून जाहीर केले आहेत. या दोन्ही भागांना डोन्बास असे म्हणतात. डोन्बासमध्ये रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावाद्यांचे वर्चस्व आहे. वर्ष 2014 पासून हा भूभाग युक्रेन सरकारच्या नियंत्रणाबाहेर असून त्यांनी स्वत: ला स्वतंत्र प्रजासत्ताक घोषित केले आहे. या भूभागाला रशिया आणि बेलारूसने मान्यता दिली आहे. डोन्बासमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 15000 लोकांचा मृत्यू झाला असल्याचा युक्रेन सरकारने दावा केला आहे.
रशियन सरकार डोन्बासमधील भागातील नागरिकांना अनेक प्रकारची मदत करते. यामध्ये गुप्त पद्धतीने लष्करी मदत, आर्थिक मदत, कोरोना लशीचा पुरवठा आदींचा समावेश आहे. त्याशिवाय, या प्रांतात वास्तव्य करणाऱ्या जवळपास आठ लाख नागरिकांकडे रशियन पासपोर्ट असल्याचे म्हटले जाते. डोन्बासमध्ये रशियन भाषिक नागरिकांची संख्या अधिक आहे. या नागरिकांचा ओढा रशियाकडे आहे. तर, युक्रेन सरकार या लोकांना फुटीरतावादी असल्याचे मानते. युक्रेन सरकारकडून या भागात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करण्यात येतो असा आरोप रशियाकडून करण्यात येतो.