Home महाराष्ट्र अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कुणाला हवी होती? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कुणाला हवी होती? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

0

मुंबई,दि.२५: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर आता पक्षांतर्गत संघर्षाने नवे वळण घेतले आहे. आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अजितदादांच्या मृत्यूनंतर या नेत्यांना राष्ट्रवादी पक्षावर कब्जा करायचा होता, असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमका आरोप काय?

रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, अजितदादांचा अपघात २८ जानेवारी रोजी झाला. त्यानंतर अवघ्या १८ दिवसांनी म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवण्यात आले. या पत्रात पक्षाच्या घटनेत बदल करून सर्व अधिकार कार्याध्यक्षांकडे असतील, असे नमूद करण्यात आले होते.

“अजितदादांच्या निधनानंतर पक्ष ताब्यात घेण्याची ही घाई कशासाठी होती? ही तयारी आधीच झाली होती का?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

सुनेत्रा पवारांच्या पत्राने फुटले भांडे?

१० मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले. त्यात त्यांनी स्पष्ट केले की, “अजितदादांच्या अपघातापासून (२८ जानेवारी) मी राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जर कोणीही निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला असेल, तर तो गृहीत धरू नये.” सुनेत्रा पवार यांच्या या भूमिकेमुळे पटेल आणि तटकरे यांच्या हालचाली उघड झाल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे.

पियुष गोयल यांच्या ‘त्या’ विधानाचा संदर्भ

रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या एका जुन्या विधानाचाही आधार घेतला. गोयल यांनी प्रफुल्ल पटेल अध्यक्ष झाल्याचे विधान केले होते आणि नंतर ‘चूक झाली’ म्हणून सारवासारव केली होती. हा सर्व घटनाक्रम नियोजित कटाचा भाग असल्याचा संशय पवारांनी व्यक्त केला आहे.

“सुनेत्रा काकी, अवतीभोवतीच्या लोकांपासून सावध राहा”

राजकारण सध्या अत्यंत खालच्या थराला गेले आहे, असे सांगताना रोहित पवारांनी सुनेत्रा पवार यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. “सुनेत्रा काकींनी त्यांच्या अवतीभोवती असलेल्या लोकांपासून जपून राहावे, तटकरे आणि पटेल यांना गोड बोलून काम साधण्याची सवय आहे,” असेही ते म्हणाले.

दरम्यान, या गंभीर आरोपांनंतर सुनील तटकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहेत. आता या वादावर तटकरे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.