28 वर्षानंतर भाजपाचा पराभव, कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी

0

पुणे,दि.2: कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी झाले आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवात झाल. पोस्टल मतदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. मतमोजणीपासून धंगेकर यांनी आता 11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. वनी पेठे हा भाजपचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपची पिछेहाट झाली. विशेष म्हणजे, भाजपने कसबा पोटनिवडणुकीमध्ये सर्व ताकदपणाला लावली होती. मनसे, शिवसेना शिंदे गटाने सुद्धा भाजपला पाठिंबा दिला होता. पण, पुणेकरांनी भाजपला धक्का देत रवींद्र धंगेकर यांना निवडून दिलं आहे. रवींद्र धंगेकर यांच्या विजयाची चाहूल लागताच काँग्रेसच्या समर्थकांनी जोरदार जल्लोषाला सुरुवात केली आहे.

या दोन्ही जागांसाठी रविवार 26 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने यांचा सामना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी होता. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना रिंगणात उतरवलं. अपक्ष म्हणून राहुल कलाटेही रिंगणात उतरले होते.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झालं. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत, यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता. दुसरीकडे चिंचवड विधानसभेमध्ये 50.47 टक्के मतदान झालं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here