मुंबई,दि.१८: Rajinikanth met Uddhav Thackeray: सुपरस्टार रजनीकांत (Rajinikant) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेतली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) स्टेडियमवर गेले होते. आता थलायवाला सामना पाहायला येणार आणि तो सामना भारत जिंकणार नाही असं तर होणार नाही ना!
रजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट | Rajinikanth met Uddhav Thackeray
आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी फोटो शेअर करत ही माहिती दिली. आदित्य यांच्या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबद्दल माहिती मिळू शकली नाही. मात्र, ठाकरेंचा कठीण काळ सुरू असताना रजनीकांत यांनी मातोश्रीवर येऊन भेट घेतल्याने अनेक अर्थ काढले जात आहेत.
वृत्तानुसार, रजनीकांत यांना बीसीसीआयने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. सामन्यादरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी त्यांचे स्वागत केले. रजनीकांत स्टेडियममध्ये दाखल होताच सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला.
बाळासाहेब हे चित्रपटशौकीन आणि कलाकारांचे स्नेही होते, त्यामुळेच दिग्गज कलाकारही बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर जात होते. यापूर्वीही रजनीकांत यांनी बाळासाहेबांना भेटून त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं. सन २०१० मध्ये रजनीकांत यांचा ‘रोबोट’ म्हणजेच तामीळ भाषेतला ‘एंद्रीयन’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निमित्तानं रजनीकांत मुंबईत आले होते. त्या वेळी त्यांनी बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, दुपारच्या वेळेत भेटून त्यांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, तामिळचं राजकारण आणि सिनेसृष्टीबद्दलही मनमोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या. दरम्यान शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे त्या भेटीचे साक्षीदार होते.
राज्याच्या राजकारणात शिवसेनेसाठी हा कठिण काळ सुरू आहे. अनेक जवळचे दूर निघून गेले. पण, मुंबईत आल्यानंतर बाळासाहेब हयात नसतानाही रजनीकांत यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी, रजनीकांत यांच्यासमवेत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकारे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे फोटोत दिसून येत आहेत.








