Rajesh Tope: राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या व्हेरियंटचे ७ रुग्ण सापडल्यानंतर दिली प्रतिक्रिया

0

दि.२९: आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या व्हेरियंटचे (Omicron Varient) ७ रुग्ण सापडल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॅान विषाणूचे नवे उत्परिवर्तन असलेले बीए.४ आणि बीए.५ चे रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याने चिंता वाढली आहे. या प्रकारांचे सात रुग्ण पुणे शहरात सापडल्याने दक्षता घेण्यात येत आहे. यादरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी क्लस्टर जिल्ह्यांना काळजी घेण्यासाठी सूचना करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरू असणाऱ्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार ही माहिती पुढे आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवारी आपल्या दैनंदिन अहवालातून याबाबत माहिती दिली आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे प्रकार आढळले असून फरिदाबाद येथील इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर (आयबीडीसी) या संस्थेने त्यास दुजोरा दिला आहे.

राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, हे सर्व रुग्ण पुणे शहरातील आणि ४ मे ते १८ मे २०२२ या कालावधीतील आहेत. त्यांत चार पुरुष, तर तीन महिला आहेत. चार रुग्ण ५० वर्षांवरील वयोगटातील तर दोन २० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. एक रुग्ण नऊ वर्षांचा आहे. दोन रुग्णांचा दक्षिण आफ्रिका आणि बेल्जियम प्रवास झाला आहे. तिघांनी केरळ आणि कर्नाटक येथे प्रवास केला आहे. उर्वरित दोन रुग्णांनी प्रवास केलेला नाही. नऊ वर्षे वयाचा मुलगा सोडल्यास इतर सर्वाचे करोना लसीकरण पूर्ण झाले आहे.

राजेश टोपे म्हणाले

“मुंबईत काल अचानकपणे ५०० रुग्ण वाढले आहेत. क्लस्टर भाग असणाऱ्या ठाणे, पुणे, पालघर या ठिकाणीदेखील संख्या वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. आज ज्या ३० ते ४० हजार चाचण्या आम्ही करत आहोत त्या वाढवाव्या लागतील. क्लस्टर जिल्ह्यांना त्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. काळजी करण्याचं, घाबरण्याचं सध्या काही कारण नाही, पण काळजी घ्यावी लागेल,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

“संख्या वाढत आहे तिथे लोकांनी प्रसार होऊ नये यासाठी मास्क वापरत काळजी घेण्याची गरज आहे,” असं आवाहनही राजेश टोपे यांनी यावेळी केलं.

फारसा धोका नाही

विषाणूचा नवा प्रकार आढळला असला तरी हा प्रकार ओमायक्रॉन प्रकारातील असल्यामुळे सध्या तरी त्याचा फारसा धोका नाही. तसेच रुग्णसंख्या वाढत असली तरी ओमायक्रॉनच्या तिसऱ्या लाटेच्या तुलनेत हा वेग कमी आहे. पुढील काही दिवस रुग्णसंख्येत वाढ होत राहील, परंतु रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यू यांचे प्रमाण कमी राहिल्यास चिंतेचे कारण नाही. या दृष्टीने या दोन्ही बाबींवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

बीए.४ आणि बीए.५ हे ओमायक्रॉनचे प्रकार आहेत. या प्रकारच्या विषाणूच्या प्रादुर्भावाचा वेग लक्षणीय असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रुग्णआलेखावरून आढळले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here