Rajeev Chandrasekhar: तुम्ही भारताबरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर, तुमची मुलं दुसऱ्यांना…

0

नवी दिल्ली,दि.१७: Rajeev Chandrasekhar: केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी देशविरोधी घटकांना इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये मागील पाच दिवसांपासून चकमक सुरू आहे. आतापर्यंत भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून इतर दोन दहशतवादी अद्याप गुहेत लपल्याची माहिती मिळत आहे. कोकेरनाग जंगल परिसरात ही चकमक सुरू आहे. येथील एका टेकडीच्या माथ्यावर असलेल्या गुहेत दहशतवादी लपून बसले आहेत.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा इशारा | Rajeev Chandrasekhar

या घडामोडीनंतर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून देशविरोधी घटकांना इशारा दिला आहे. भारताशी कुणी युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची मुलं दुसऱ्यांना सांभाळावी लागतील, अशा शब्दांत राजीव चंद्रशेखर यांनी इशारा दिला आहे.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “भारताला अनेक शत्रू आहेत. या शत्रूंना भारताचा विकास रोखायचा आहे. पण त्यांना हे माहीत असलं पाहिजे की, भारतीय लष्कर हे एक ‘घातक मशीन’ आहे. त्यामुळे त्यांनी अशी कोणतीही चूक करू नये. हे तुम्ही टाळलं पाहिजे.”

“हा नवा भारत आहे. हा भारत शत्रूंसमोर कधीच गुडघे टेकू शकत नाही. भारताने यापूर्वी अनेक युद्धे पाहिली आहेत. आम्हाला युद्ध नको आहे. पण तुम्ही भारताबरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर, तुमची मुलं दुसऱ्यांना सांभाळावी लागतील, हे लक्षात ठेवा,” अशा शब्दांत राजीव चंद्रशेखर यांनी इशारा दिला आहे.

खरं तर, जम्मू काशमीरच्या अनंतनाग येथील कोकेरनाग जंगलात बुधवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. कोकरनागमध्ये दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर लष्कराच्या जवानांनी आणि स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम राबवली. तेव्हापासून चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. तर भारतीय लष्कराचे दोन जवानही शहीद झाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here