मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भोंगा वादावरुन इशारा

0

मुंबई,दि.१०ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भोंगावादा वरुन इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुले पत्र लिहिले आहे. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असे मुख्यमंत्र्यांना सुनावत राज ठाकरेंनी भोंग्याच्या प्रश्नी होणारी मनसे कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या धरपकडीवर आक्रमक भूमीका घेतली आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला आहे.

“भोंगे उतरवा आंदोलनावरून गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की, मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का?”, असा सवाल राज ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला.

राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत. जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. राज्य सरकारला माझे एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here