सोलापूर,दि.4: राज्यातील महापालिकेकरिता 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र अनेक महापालिकेत सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत. विशेषतः भाजपाचे सर्वाधिक बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे. 75 च्या वर बिनविरोध निवडून आलेले आहेत. मतदान होण्यापूर्वीच विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने हा विजय निश्चित झाला.
बिनविरोध निवडीमुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. एकप्रकारे भाजपाच सत्तेत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या बिनविरोध निवडीवर प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व घटनेवर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आश्चर्य व्यक्त केलंय. यावरच न थांबता खास ठाकरे शैलीत ते लाव रे तो व्हिडिओ लावून याची पोलखोल करणार आहेत.
काय म्हणाले राज ठाकरे?
माझ्या संपूर्ण आयुष्यात मी अशी निवडणूक कधीच पाहिली नाही. बाळासाहेब ठाकरेंबरोबर अनेक निवडणुका अनुभवल्या, पण इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध होणे ही पहिलीच वेळ असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ही परिस्थिती त्यांना नवीन आणि आश्चर्यकारक वाटते.राज ठाकरे हे ठाण्यात बोलत होते. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि माजी आमदार राजू पाटील यांच्यासमोर उपस्थित होते. ठाणे राज ठाकरेंचा बालेकिल्ले मानला जातो, त्यामुळे तेथील राजकीय घडामोडींवर त्यांचे विशेष लक्ष आहे.
राज ठाकरे करणार पोलखोल
ठाणे, कल्याण डोंबिवली सह राज्यात निवडून आलेल्या 65 महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरे यांच्याकडे पुरावे असल्याचे सांगण्यात आले आहे. येणाऱ्या सभांच्या माध्यमातून राज ठाकरे महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची पोलखोल करणार आहेत. कॉल रेकॉर्ड, व्हिडिओ यांच्यासह अनेक महत्त्वाचे पुरावे राज ठाकरे यांच्याकडे नेत्यांनी सुपूर्त केले.








