मुंबई,दि.९: ईव्हीएम मशीनचा उल्लेख करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खळबळजनक दावा केला आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खळबळजनक दावा केला. राज्यातील २९ महापालिका करिता १५ जानेवारीला मतदान होणार आहे तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलं आहे. नुकतेच भाजपाचे आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये १२८ पैकी १२५ नगरसेवक भाजपचे निवडून येतील, असा दावा केला होता.
जगताप यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष योगेश बहल यांनी भाजपाने नगरसेवकांना पक्षात घेताना मतदान यंत्रामध्ये (ईव्हीएम मशीन) दोन ते अडीच हजार मते आपोआप मिळतील असे सांगितले होते असा केला होता. बहल यांच्या म्हणण्यानुसार भाजपाने ईव्हीएम मशीन छेडछाड केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले, परवा चार-पाच दिवसांपूर्वी ते आलं होतं, फार कोणी चालवलं नाही, अजित पवार स्वतः म्हणाले आमच्या लोकांना सांगितलं गेलं की, आमच्याकडे या आमच्या पक्षात या.. म्हणजे भाजपामध्ये या.. अडीच अडीच हजार मते आम्ही आधीच मशीनमध्ये भरलेले आहेत. माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा असंही राज ठाकरे म्हणालेत.., तर सत्तेमधीलच एक भाग जो आता वेगळा होऊन महानगरपालिका निवडणूक लढवत आहे, इतका जबाबदार माणूस.. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अशा प्रकारचं स्टेटमेंट करतो की, भाजपने मशीन मध्ये अडीच अडीच हजार मते भरलेली आहेत म्हणजे आम्ही काय समजायचं सांगा. या सगळ्यांमध्ये जिंकण्या हरण्याचा विषय नाही. ही फेअर इलेक्शन नाहीयेत, इतकंच फक्त आम्हाला सांगायचं आहे, असे पुढे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
प्रभाग पद्धतीवर टीका
“प्रभागात चार नगरसेवक. चार वेगवेगळी माणसे निवडून येतात आणि मग कोणीच काम करू शकत नाही. कारण एखादा काम करायला गेला की दुसरा आडकाठी करतो. म्हणजे तो प्रभागाला काही अर्थच उरत नाही. याबद्दल उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात गेलो. ते म्हणतात की, हे निवडणूक आयोगाकडे येते. निवडणूक आयोग सांगतो की हा राज्य सरकारचा निर्णय आहे. मग आरक्षण पण सरकारचं पाडणार, प्रभागही सरकारच ठरवणार, सगळे सेट करायचे आणि मग विरोधकांना सांगायचं की आता लढा”, अशी टीका राज ठाकरेंनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर केली.
“ज्यांच्याकडे सत्ता नाही, त्यांना तुम्ही कायमचे बेसावध ठेवता. आता साधी गोष्ट की, चार प्रभाग करायची काय गरज आहे. हे फॅड खरंतर काँग्रेसच्या काळात आलं. दोन प्रभाग, चार प्रभाग. मला कळत नाही की, एखाद्या मतदारांने तिथे जाऊन चार बटणे का दाबायची? अशा प्रकारची व्यवस्था भारतात कुठेच नाहीये”, असे राज ठाकरे म्हणाले.








