मुंबई,दि.24: एकनाथ शिंदे गटाला मनसेमध्ये विलीन करण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी मोठं विधानं केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखातीत मोठं विधानं केलं आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे गटामध्ये एकूण 40 आमदार सामील झाले आहेत. या बंडानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे.
तर दुसरीकडे राज्यात शिंदे सरकार स्थापन झालेले असले तरी, हे सरकार कायद्याच्या कसोटीवर टिकणार का? असे विचारले जात आहे. सरकार शाबूत ठेवायचे असेल तर शिंदे गटाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल, असा दावा करण्यात येत आहे. असे असताना शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखातीत त्यांनी वरील भाष्य केले.
“हे (शिवसेनेतील बंडखोर आमदार) माझे जुने सहकारी आहेत. याआधी त्यांनी माझ्यासोबत काम केलेले आहे. मला याबद्दल तांत्रिक माहिती नाही. पण उद्या त्यांच्याकडून असा प्रस्ताव आला तर मी नक्की विचार करेन,” असे राज ठाकरे म्हणाले. तसेच माझ्यासाठी सर्वप्रथम माझा महाराष्ट्र सैनिक असेल. बाकी सगळे नंतर येतील, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेत बंडखोरी झालीच नसती. ते शक्यच नव्हतं. शिवसेना एक पक्ष म्हणून पाहू नका. बाळासाहेब होते तोपर्यंत शिवसेनेत बाळासाहेबांच्या विचाराने माणसं बांधली गेली होती. बाळासाहेब होते तोपर्यंत तो विचार होता आणि त्या विचाराने बांधलेली ती माणसं होती. त्यामुळे बाळासाहेब असते तर बंडखोरी झालीच नसती.”