अमित ठाकरेंना मंत्रिपद? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं स्पष्ट

0

मुंबई,दि.१४: भाजपाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करून मोठा धक्का दिला होता. राज्यातील सत्ता पालटल्यानंतर भाजपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर दिल्याचे माहिती समोर आली होती. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यादरम्यान राज ठाकरे यांना मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. एबीपी माझाशी बोलताना राज ठाकरेंनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपाकडून अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र राज ठाकरेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

अमित ठाकरेंना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं वृत्ताला राज ठाकरेंनी दुजोरा दिलेला नाही. ही बातमी खोटी असून, कोणीतरी केलेला खोडसाळपणा असल्याचं सांगितलं आहे. तसंच कोणीतरी जाणुनबुजून राजकीय वातावरण निर्माण कऱण्यासाठी आमच्या नावांचा वापर करत असल्याचंही म्हटलं आहे. राज ठाकरेंनी हे वृत्त पसरवणाऱ्यांवर नाराजीदेखील जाहीर केली आहे.

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पत्र लिहून कौतुकही केलं होतं. तसंच राज्यसभा, विधान परिषद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेने भाजपाला मदत केली होती. यावेळी मनसेला दोन मंत्रीपदं मिळणार असल्याची चर्चा होती. पण राज ठाकरेंनी त्यावर कोणतंही भाष्य केलं नव्हतं. पण अमित ठाकरेंच्या नावाची चर्चा रंगू लागल्यानंतर अमित ठाकरेंनी वृत्ताचं खंडन केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here