“महाराष्ट्रात असं पुन्हा घडलं तर…” मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा इशारा

0

मुंबई,दि.29: मुंबईतील मुलुंडमध्ये (Mulund) मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारल्याच्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात असं पुन्हा घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित,” असा इशारा त्यांनी दिला. सोबतच सरकारने पण धाक दाखवला पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला. तसंच “अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे,” असं आवाहन त्यांनी मनसैनिकांना केलं आहे.

दोन दिवसापूर्वी मुलुंडमध्ये मराठी महिलेला ऑफिससाठी गुजराती पिता पुत्रांनी जागा नाकारल्याची घटना समोर आली होती. ही घटना तृप्ती देवरुखकर या महिलेने फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत सांगितली होती. यानंतर काही वेळातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंलुंडमध्ये जात त्या घटनेचा निषेध करत संबंधीत गुजराती पित्रा, पुत्रांना जाब विचारला होता. यानंतर राज्यभरातून प्रतिक्रीया आल्या होत्या.

मनसैनिक मुलुंडमधील संबंधित इमारतीत पोहोचले. जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्राला तृप्ती यांची माफी मागायला लावली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क केला. त्यानंतर तृप्ती देवरुखकर यांनी बुधवारी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्याविरोधात कलम 341, 323, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलुंड पोलिसांनी यातील दोन्ही आरोपी प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर यांना रात्री ताब्यात घेतलं.

राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे यांनी ट्वीट करुन प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहितात की, “मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे!

दरम्यान या सगळ्या प्रकारातील पीडित महिला तृप्ती देवरुखकर या राज ठाकरे यांनी भेट घेण्यासाठी मुंबईतल त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. इथे त्या शर्मिला ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं कळतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here