राज ठाकरेंना मराठी हृदयसम्राटच्या जागी नवी उपाधी; पुणे दौऱ्याआधीच पोस्टरवरील उल्लेखाची चर्चा अधिक

0

पुणे,दि.१५: महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी भाषा, मराठी लोकांसाठी पक्ष आहे असे समजले जात होते. मराठी लोकांना न्याय, हककासाठी याची स्थापना करण्यात आल्याचे वाटत होते. मनसे स्थापनेनंतर मराठी भाषेचा, भूमिपुत्रांचा विषय हाती घेणाऱ्या राज ठाकरेंचा (Raj Thackeray) प्रवास आता आक्रमक हिंदुत्वाच्या दिशेनं सुरू झाला आहे. मशिदीवरील भोंगे उतरवा, अन्यथा त्यांच्यासमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज यांनी राज्य सरकारला दिला. मुंबई, ठाण्यात राज यांच्या सभा झाल्या. आता राज ठाकरे पुण्यात जाणार आहेत. उद्या हनुमान जयंतीनिमित्त राज यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला असल्याने येत्या हनुमान जयंतीला ते काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता होती. मात्र याबद्दल आता स्पष्टता झाली आहे. पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. संध्याकाळी ६ वाजता ही आरती होणार आहे. महत्वाचं म्हणजे या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी हाती घेतलेल्या नव्या मिशनची सुरुवात उद्या पुण्यातून होईल. खालकर मारुती चौकात राज यांच्या हस्ते महाआरती होईल. सामुदायिक हनुमान चालिसा पठण करण्यात येईल. या भागात जवळपास कोणतीही मशीद नाहीए. मात्र राज यांच्या हस्ते होणारी महाआरती बदलत्या राजकीय वातावरणाचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.

मुंबईतील गुढीपाडव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर ठाण्यात उत्तरसभा घेत होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं होतं. यावेळी त्यांनी भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं होतं. त्यामुळे मुंबई, ठाण्यानंतर आता राज ठाकरेंनी आपला मोर्चा पुण्याकडे वळवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here