याकारणामुळे राहुल नार्वेकर एक दिवस आधीच घेणार आमदार अपात्रतेवर सुनावणी

0

मुंबई,दि.११: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रेवर कारवाई सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात शिवसेनेतील फूट आणि त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रतेसंदर्भातील याचिकांची चर्चा चालू आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही ५ महिन्यांचा काळ उलटून गेला आहे. गेल्या महिन्यात अध्यक्षांकडून सुनावणी घेण्यासाठी वेळकाढूपणा केला जात असल्याची तक्रार करत विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर न्यायालयाने अध्यक्षांना याबद्दल फटकारलं. त्यानंतर सुनावणीचं वेळापत्रक अध्यक्षांनी जाहीर केलं. आता १३ ऑक्टोबरला असणारी नियोजित सुनावणी अध्यक्ष एक दिवस आधीच घेत आहेत.

शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गट यांच्या आमदार अपात्रता याचिकांवर सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी चालू आहे. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावल्यामुळे कुठला पक्ष खरी शिवसेना, कुणाचा व्हीप वैध या मुद्द्यांचा सोक्षमोक्ष अध्यक्षांनी लावणं अपेक्षित आहे. यादरम्यान, १३ ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी नियोजित केली असताना ती अचानक एक दिवस आधी घेतली जात आहे.

काय आहे कारण?

सुनावणीमध्ये कोणतीही घाई करणार नसून नियमानुसारच सर्व गोष्टी पार पडतील, अशी भूमिका राहुल नार्वेकरांनी पहिल्यापासूनच स्पष्ट केली आहे. मात्र, अचानक अशा प्रकारे सुनावणी एक दिवस आधी घेण्यामागे नेमकं कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. यासंदर्भात माध्यमांनी विचारणा केली असता राहुल नार्वेकरांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल नार्वेकर काय म्हणाले?

१३ ऑक्टोबर रोजी मला दिल्लीतील एका कार्यक्रमाचं आमंत्रण आलं आहे. मी या कार्यक्रमात उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे मी १३ तारखेची सुनावणी १२ तारखेला घेत आहे. मला यात कोणतीही दिरंगाई करायची नाहीये. लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मी एक दिवस आधी सुनावणी घेणार आहे”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

दरम्यान, यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेलाही उत्तर दिलं. “जर मला दिरंगाईच करायची असती, तर या कारणास्तव मी ती पुढे ढकलू शकलो असतो. पण मी तर एक दिवस आधी सुनावणी घेतोय. माझ्यावर होणाऱ्या आरोपांमागचा हेतू मला माहिती आहे. पण यामुळे माझ्या निर्णयप्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना कदाचित या या संपूर्ण निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकायचा असेल. पण याचा माझ्यावर कोणताही प्रभाव पडू शकत नाही. नियमानुसार मी माझा निर्णय घेईन”, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here