MLA Disqualification Action: आमदार अपात्रेसंदर्भात कारवाईस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली सुरुवात

0

मुंबई,दि.17: MLA Disqualification Action: 16 आमदार अपात्रेसंदर्भात कारवाईस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरुवात केली आहे. राहुल नार्वेकर यांनी 54 आमदारांना (शिंदे व ठाकरे गट) नोटीस बजावली आहे. दोन्ही गटाकडून पक्षाची घटना मागवली आहे. आमदारांना 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय योग्य वेळेत घ्यावा असे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेले निर्णय असंविधानिक होते असे म्हटले होते.

न्यायालयाने राजकीय पक्ष कोणाचा यासंदर्भातही अगोदर निर्णय घ्यावा असे निर्देश दिले आहेत. शिंदे गटाने भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. प्रतोद हा पक्ष ठरवत असतो, विधिमंडळातील आमदार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट मत व्यक्त केले होते.

काय म्हणाले होते राहुल नार्वेकर? | MLA Disqualification Action

शिवसेना कोणाची आहे आणि प्रतोदपदी कोण राहील, याबाबत आधी निर्णय होईल आणि त्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले. भरत गोगावले यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी रद्द केलेली नाही, असेही नार्वेकर यांनी नमूद केल्याने त्यांच्या फेरनियुक्तीचेही संकेत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागण्याची चिन्हे आहेत. नार्वेकर हे लंडन दौऱ्यावरून सोमवारी परतले असून सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षांबाबतचा निर्णय, आमदार अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणी, प्रतोदपदी शिंदे गटाचे भरत गोगावले राहणार की ठाकरे गटाचे सुनील प्रभू अशा विविध मुद्दय़ांवर नार्वेकर यांनी भाष्य केले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here