Ro Khanna: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, अमेरिकन खासदार रो खन्ना म्हणाले…

0

मुंबई,दि.२५: Ro Khanna On Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर अमेरिकन खासदार रो खन्ना (Ro Khanna) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतातील सर्व विरोधी पक्षांनी गांधी यांच्यावरील कारवाईबाबत निषेध व्यक्त केला आहे. राहुल गांधींवरील कारवाईविरोधात देशभरातलं वातावरण तापलं असतानाच आता त्याची भारताबाहेरही दखल घेतली जाऊ लागली आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार रो खन्ना यांनी ही कारवाई अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. खन्ना म्हणाले की, “राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द करणं हा गांधीवादी विचारसरणीचा मोठा विश्वासघात आहे.” मोदी या आडनावावरून केलेल्या टीकेमुळे राहुल गांधी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. (Rahul Gandhi News)

राहुल गांधी काय म्हणाले होते? | Rahul Gandhi News

‘सर्व चोराचं आडनाव मोदी कसं?’ असा सवाल २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी यांनी केला होता. याप्रकरणी राहुल यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी करताना सुरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांचं संसदेतलं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.

रो खन्ना यांनी केले ट्वीट | Ro Khanna

रो खन्ना यांनी ट्वीट केलं आहे की, “राहुल गांधींची संसद सदस्यता रद्द करणं हा गांधीवाधी विचारसरणी आणि भारताच्या मूल्यांसोबत केलेला विश्वासघात आहे. माझ्या आजोबांनी ज्यासाठी त्यांच्या आयुष्याची अनेक वर्ष तुरुंगात घालवली तो हा भारत नाही.” रो खन्ना हे यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सिलिकॉन व्हॅलीचे प्रतिनिधित्व करतात.

मोदींकडे हस्तक्षेपाची मागणी | Ro Khanna On Rahul Gandhi

रो खन्ना यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. रो खन्ना यांनी आणखी एक ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करून म्हटलं आहे की, “भारतीय लोकशाहीच्या हितासाठी तुमच्याकडे हा निर्णय बदलण्याची ताकद आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here