Rahul Burahanpure: सोलापूरच्या राहुल बुऱ्हाणपुरे यांनी बनविला चारचाकी गाड्यांमधील प्रदूषण कमी करणारा पार्ट

0

सोलापूर,दि.७: सोलापूर येथील राहुल बुऱ्हाणपुरे (Rahul Burahanpure) या युवक अभियंत्याने सलग दोन वर्षे अथक संशोधन करून चारचाकी गाड्यांमधील प्रदूषण कमी करणारा ई. जी. आर. हा विशेष पार्ट बनविला असून याला पेटंटही मिळाले आहे. आता त्यांना मिळालेले हे पेटंट भारतातील नामवंत कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने तब्बल १३ कोटी ५२ लाख रुपयांना विकत घेतले आहे.

या पार्टमुळे प्रदूषणात सरासरी ३० टक्के एवढी घट होऊन गाडीचे मायलेजही सुधारणार असल्याची माहिती बुऱ्हाणपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूरच्या राहुल बुऱ्हाणपुरे यांनी बनविलेला हा पार्ट | Rahul Burahanpure

राहुल यांनी बनविलेला हा पार्ट चारचाकी गाड्यांची दूषित हवा बाहेर फेकल्या जाणाऱ्या ठिकाणी म्हणजेच सायलेन्सरजवळ बसविला जातो. सध्याच्या वाहनांमध्ये १९९० पासून ई. जी. आर. सिस्टिमचा वापर केला जातो, त्याच ई.जी. आर. म्हणजेच (एक्झॉस्ट गॅसेस रिसायकल) पार्टचे काम प्रभावीपणे होण्यासाठी हा पार्ट उपयोगी पडतो. पी. सी. एम. या सेन्सरद्वारे हा पार्ट नियंत्रित केला जातो. त्यामुळे सायलेन्सद्वारे बाहेर फेकली जाणारी ३० टक्के दूषित हवा या पार्टद्वारे पुन्हा रिसायकल होऊन इंजिनमध्ये सोडली जाते. त्यामुळे प्रदूषणात सरासरी ३० टक्के एवढी घट तर होतेच तसेच नायट्रोजन ऑक्साईडही ७० टक्के कमी करण्यात याची मदत होते.

या शिवाय गाडीचे मायलेजही सुधारते. साधारणतः पुढील वर्षापासून म्हणजेच २०२४- २५ नंतर टाटा मोटर्सकडून या पार्टचा वाहनांमध्ये वापर सुरू होणार आहे, असेही राहुल यांनी सांगितले. विशेष म्हणजे चारचाकी वाहनांमधून नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन यासारखे घातक वायू उत्सर्जित केले जातात. त्यातील नायट्रोजन ऑक्साईड हा मानवी शरीरासाठी सर्वात जास्त नुकसानदायक असून या पार्टद्वारे त्याचा प्रभाव कमी होणार आहे.

राहुल यांचे ऑटोमोबाईलचे शिक्षण दिगंबर जैन गुरूकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे झाले. तेथे त्यांना एम.सी.व्ही.सी. ऑटोमोबाईल क्षेत्रातील शिक्षक संजय कुरनूरकर व संपतकुमार झळके यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असून त्यांचे पुढील शिक्षण हे एस.ई.एस. पॉलिटेक्निक, सोलापूर तर पदवी पुणे येथील एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधून २०१४-१५ पूर्ण झाले आहे.

राहुल हे मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्यांचे वडील सोलापुरातील एका साडी दुकानात काम करतात तर आई गृहिणी आहे. दरम्यान, २०१० मध्ये एका खासगी गॅरेजमध्ये काम करत असताना त्यांना चारचाकी गाड्यांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी एक कल्पना सुचली व त्यांनी यावर तब्बल २ वर्षे संशोधन करुन चारचाकी गाड्यांमधील प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनविला. हा पार्ट इंडियन स्टँडर्ड नॉर्म्सनुसार बनविला असून तो दोन-तीन मोटार कंपनीना व लॅब टेस्टिंगसाठी बंगळुरू व दिल्ली येथे तपासणीसाठी पाठविला होता.

त्याचे पेटंट घेण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले. सततच्या पाठपुराव्यानंतर शेवटी २०२२ मध्ये पेटंट मिळविले. तब्बल १०-११ वर्षाच्या मेहनतीनंतर कंपनी टाटा व फोर्ड मोटार्स आणि महिन्द्रा ॲन्ड महिन्द्रा लिमिटेड कंपनीने त्याच्या या पार्टचे महत्त्व ओळखून त्यांच्याकडून हा पार्ट भारतातील दिग्गज अशा टाटा मोटार्स कंपनीने विकत घेतल्याचे संशोधक राहुल यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस संपतकुमार झळके, माउली झांबरे, बसवराज बुऱ्हाणपुरे, अतुल वावटणकर, प्रा. चन्नवीर चिट्टे आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here