पुणे,दि.२६: Pune Satara Highway Accident: कारचा पुणे सातारा महामार्गावर (Pune Satara Highway) भीषण अपघात (Accident) झाला आहे. कार थेट दुभाजकाला धडकली आणि थेट दुसऱ्या लेनमध्ये शिरल्याची घटना समोर आली आहे. दुसऱ्या लेनमधून कोणतेही वाहन येत नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे या वाहनातून प्रवास करत असलेल्या चौघांचा जीव केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचला. कारमधील एअर बॅग्ज वेळीच उघडल्याने यातील प्रवाशांचे जीव वाचले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पुणे सातारा महामार्गावर असणाऱ्या शिंदेवाडी गावाजवळ सकाळच्या सुमारास पाऊस येत होता त्यामुळे कारचालकला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे वाहन थेट दुभाजकावर जाऊन धडकले. दोन पलटी खाऊन ती कार थेट दुसऱ्या लेन्समध्ये जाऊन उभी राहिली. तिथे कुठलेही वाहन येत नसल्याने मोठा अपघात टळला आहे. परंतु ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.मात्र, गाडीतील एअर बॅग योग्यवेळी उघडल्याने प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.
या कारमधून चार प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात कारचं बोनेट, दरवाजा यांना जबर फटका बसून मोठं नुकसान झालं. एअरबॅग जर वेळीच उघडल्या नसत्या तर या कारमधील चारही जणांचं काय झालं असतं, याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी होती. या अपघातानंतर कारची झालेली अवस्था पाहून कारमधील प्रवासीही हादरुन गेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले.सातारा महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांकडून ती अपघातग्रस्त कारा बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.