सोलापूर,दि.19: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोलापुरात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे वाटप करण्यात येणार आहे. 30 हजार घरांचा हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. मोदींच्या हस्ते 15 हजार घरकुलांचे वाटप होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी सोलापुरात ठिकठिकाणी फलक लागले आहेत.
रे नगर हा 30 हजार घरांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात 7 पाण्याच्या टाक्या असणार आहेत. मोदी यांची सभाही होणार आहे. एक लाखाहून अधिक लोक मोदींच्या सभेला उपस्थित राहतील अशी तयारी करण्यात आली आहे. याप्रसंगी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत.
रे नगर प्रकल्पातील येथील 5 लाभार्थी महिलांना मोदींच्या हस्ते चावी वाटप करण्यात येणार आहे. 9 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रे नगर घरकुल प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. चार वर्षांनंतर पंतप्रधान मोदी हे प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांची कामेदेखील सुरू आहेत.