ॲट्रॉसिटी प्रकरणी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन

0

सोलापूर,दि.२३: ॲट्रॉसिटी प्रकरणी उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जागेच्या वादातून मारहाण व जातीवाचक शिवीगाळी केल्याप्रकरणी धनाजी गायकवाड रा. पोखरापुर, ता. मोहोळ याच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी धनाजी गायकवाड याचा अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर केला.

याप्रकरणी हकीकत अशी की दि. २८/११/२०२१ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व तिच्या कुटुंबातील सदस्य हे त्यांच्या घरासमोर बसलेले असताना आरोपी धनाजी गायकवाड याने फिर्यादीस तुम्ही बसलेली जागा माझी आहे, तुम्ही येथून निघुन जावा असे म्हणाला. फिर्यादीने जागा सोडण्यास नकार दिला तेव्हा आरोपी व त्याच्या साथीदाराने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली अशा आशयाची फिर्याद आरोपीविरुध्द मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

सोलापूर सत्र न्यायालयाने आरोपी धनाजी गायकवाड याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपी धनाजी गायकवाड याने ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की केवळ आरोपींना त्रास देण्यासाठी खोटी फिर्याद दाखल केलेली असून फिर्यादीत कथन केलेली घटना संशयास्पद आहे.

सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायमूर्तींनी आरोपी धनाजी गायकवाड याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. एस. आर. आगरकर यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here