सोलापूर,दि.३०: खुनी हल्ला करुन गळयातील मंगळसुत्र हिसकावून घेतल्या प्रकरणी न्यायालयाने तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात हकिकत अशी की, दि. ०४/०६/२०२२ रोजी कुरुल, ता. मोहोळ येथील रहिवासी यांनी शेतीच्या बांधावरुन भांडण झाले व त्या भांडणामध्ये फिर्यादी वरती सत्तूर, लोखंडी बार, दगड, काठयांनी हल्ला केला व हल्ल्या दरम्यान त्यांच्या गळयातील ५ ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसुत्र हिसकावून घेतले व तसेच फिर्यादीच्या डोक्यास जबर मारहाण झाल्याची फिर्याद संशयीत गणेश जनार्दन जाधव, किशोर दाजी कदम, पोपटबाई ऊर्फ सुमन अनिल भगरे सर्व रा. कुरुल, ता. मोहोळ यांच्या विरुध्द कामती पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती.
त्यामुळे सदर संशयीतांनी अटक होण्याच्या भितीपोटी ॲड. अभिजीत इटकर व ॲड. हणमंत टेकाळे यांच्या मार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सोलापूर येथील सत्र न्यायालयात दाखल केला होता.
अटकपूर्व जामीनाच्या सुनावणी वेळी वकिलांतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदरील फिर्यादी विरुध्द यातील आरोपी किशोर कदम यांनी फिर्याद दाखल केलेली असून त्या दाखल केलेल्या फिर्यादीस शह देण्यासाठी सदरची फिर्याद दिलेली आहे. तसेच संशयीतांनी वापरलेल्या तथाकथीत हत्यांरानी सदर जखमा होणे शक्य नाही.
सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायाधीश सोलापूर यांनी सदर तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात आरोपी तर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. हणमंत टेकाळे तर सरकार पक्षा तर्फे ॲड. गुंडे यांनी काम पाहिले.