सोलापूर,दि.७: काँग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानात मोठं विधान केलं आहे. काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरु आहे. शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. लोकशाही ही लोकांची शाही असते… लोकांची हुकूमशाही असते, कोणत्या पंतप्रधानांची हुकूमशाही नसते. आम्ही आमदार आमच्या घरी असतो, तुमच्यासाठी आम्ही नोकर आणि सेवकच असतो, असं विधान प्रणिती शिंदे यांनी केलं. त्या सोलापूर येथे कार्यक्रमाला संबोधित करत होत्या.
हाथ से हाथ जोडो अभियान
काँग्रेस पक्षाने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस नेते सामान्य जनतेच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करणार आहेत. याच अभियानाचा एक भाग म्हणून काँग्रेस आमदार शिंदे सोलापुरातील एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोंदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
काँग्रेस आणि आम्ही तळागाळात तुमच्यासोबत आहोत
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, “काही दिवसांनी आम्ही घरोघरी जाऊन कुणाचं रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, अपंग दाखला किंवा जन्म दाखला, अशी सगळी कामं करणार आहोत. हेच ते ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ आहे. निवडणुका असो वा नसो, काँग्रेस आणि आम्ही तळागाळात तुमच्यासोबत आहोत. तुमच्या सुख-दु:खात आम्ही सोबत असू, कदाचित निवडणुकांमध्ये आम्ही येणार नाही. पण सुखा-दु:खात तुम्हाला जेव्हा मदत हवी असेल तेव्हा आम्ही मदतीला धावून येऊ.”
इकडे आम्ही तुमचे सेवक आणि नोकर आहोत: आमदार प्रणिती शिंदे
“आम्ही मदतीला नाही आलो, तर आमचा कान धरून आम्हाला खाली बसवा. तो तुमचा अधिकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा तो अधिकार आहे. कारण ही लोकांची शाही आहे, लोकशाही आहे. ही लोकांची हुकुमशाही आहे, कुणा पंतप्रधानांची हुकुमशाही नाही. आम्ही तुमचे नोकर आहोत. मी आमदार माझ्या घरी असेन. पण इकडे आम्ही तुमचे सेवक आणि नोकर आहोत. आम्ही तुमच्यापेक्षा मोठे नाहीत, हे तुम्ही कधी विसरू नका. घाबरू नका. ताठ मानेनं जगा”, असंही प्रणिती शिंदे भाषणात म्हणाल्या.