पुणे,दि.२: तुम्हाला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही. मेंदुला नारू झाला का? असे म्हणत मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) अनेकवेळा टीका केली आहे. राज ठाकरेंवर सुषमा अंधारे यांनी टीका केल्यामुळे प्रकाश महाजन यांनी यांच्यावर टीका केली आहे.
राज ठाकरेंवर कुणीही उठावं आणि टीका करावं? राज ठाकरे दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पित नाही. सुषमा अंधारे यांची सभा पाहिली. तुम्हाला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही. मेंदुला नारू झाला का? अशा शब्दात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पलटवार केला आहे. इतकी वर्ष महापालिकेत सत्ता असून मातोश्रीवर मजले चढले नाहीत पण कृष्णकुंजच्या बाजूला अपार्टमेंट झालं असं सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या. त्यावर मनसेने प्रत्युत्तर दिले आहे.
प्रकाश महाजन म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी बोलण्याअगोदर मालकाला विचारायला हवं होतं. माझा नेता व्यवसाय करतो. शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय असतो. इन्कम टॅक्सही भरतात. टोपल्याखाली झाकून बंगला बांधला नाही. मातोश्री २ कशी झाली? १२६ कोटी बापाचे आणि ११ कोटी मुलाचे हे कुठून आले? हे धंदा करत होते, काय करत होते? कशाला बोलताय. स्त्री म्हणून गप्प आहे. यापुढे राज ठाकरेंवर टीका कराल तर आम्हाला सगळेच माहिती आहे असा इशारा महाजनांनी सुषमा अंधारे यांना दिला.
तसेच पुत्रमोह असणे वाईट आहे का? आमच्यासमोर कधीही अमित ठाकरेला वेगळी वागणूक नाही. कळत नसताना सुद्धा पोराला कॅबिनेट मंत्री बनवलं नाही. तो कुठेही बोलतो काहीही बोलतो असं राज ठाकरेंनी केले नाही. काही महिन्यापूर्वी शिवसेनेत पुरुषांचे बंड झाले आता राहिलेल्या सेनेत महिलांचे बंड होणार आहे. या बाईमुळे जितके दिवस उजेडात बायका होत्या त्या अंधारात गेल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंना महिलांच्या बंडाला सामोरं जावं लागणार आहे असंही प्रकाश महाजन म्हणाले.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या होत्या?
सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी आता घराबाहेर पडतात अशी टीका आमच्यावर केली. पण मातोश्रीवर मजले चढले नाहीत. इतकी वर्ष महापालिका ताब्यात असतानाही मातोश्रीवर मजले चढले नाहीत पण कृष्णकुंजच्या बाजूला अपार्टमेंट झाले त्याचे काय? असं सुषमा अंधारे यांनी मुंबईच्या सभेत म्हटलं होतं. त्यावर मनसेनेही त्याला प्रत्युत्तर दिल्याने आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यात नवा वाद निर्माण होणार आहे.