मुंबई,दि.5: Prakash Ambedkar: नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना मोठा दावा केला आहे. “2024 पर्यंत काय होणार हे फक्त दोनच माणसं ठरवतील, एक म्हणजे नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि दुसरे अमित शाह (Amit Shah). या दोघांना वाटलं की या राज्यात कमी आमदार येत आहेत तर त्या राज्यातून राजकीय पक्ष संपवण्याची प्रक्रिया सुरु होईल,” असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. एबीपी माझाच्या माझा महाकट्टा या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते.
2024 पर्यंत काय होणार हे फक्त दोनच माणसं ठरवतील | Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 2024 पर्यंत काय होणार हे फक्त दोनच माणसं ठरवतील, एक म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरे अमित शाह. या दोघांना वाटलं की या राज्यात कमी आमदार येत आहेत तर त्या राज्यातून राजकीय पक्ष संपवण्याची प्रक्रिया सुरु होईल. कोल्हापूरला असताना अमित शाह यांनी सांगितलं की 48 पैकी 48 जागा घेणार. हे त्यांचं राजकीय वक्तव्य नव्हतं. ते कोणतंही वक्तव्य करायचं म्हणून करत नाहीत. त्यामागे काय मिळवायचं, कसं मिळवायचं हे ठरलेलं आहे. त्यामुळे त्याचं वक्तव्य हलक्यात घ्यायला नको. महाराष्ट्रातली स्ट्रॅटेजी त्यांनी सुरु केली आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
जातीअंताबाबत बाबासाहेब आणि महात्मा फुले…
जातीअंताबाबत बाबासाहेब आणि महात्मा फुले यांनी सुरु केलेली प्रक्रिया आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. येत्या 15-20 वर्षात डायल्यूट होऊन जाणारा हा विषय असेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आरक्षणाचा उपयोग होतो की राजकारण होतं याबाबत विचारलं असता आंबेडकर म्हणाले की, “आरक्षण हे राहणार. आरक्षणाच्या मुद्द्याकडे ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराजांशिवाय इतर कोणीही आरक्षणाला त्यांच्या राज्यव्यवस्थेत जागाच दिली नाही. देशाचा गुलामीचा इतिहास पाहिला तर असे प्रसंग सापडतात की बाहेरच्यांनी आपल्याला हरवण्यापेक्षा आतल्यांनी माहिती दिल्यामुळे आपण हरलो. याला सामाजिक अर्थ आहे. तुम्ही जर आम्हाला विचारत नसाल तर राज्य कोणाचं आहे याच्याशी संबंध नाही. आरक्षण हे विकासात्मक आहे असा कोणी विचार करु नये, असं माझं म्हणणं आहे. आरक्षण हे व्यवस्थेमध्ये शाश्वतपणा यावा म्हणून तुमचाही प्रतिनिधी आहे, एवढ्यापुरतंच मर्यादित आहे. 100 टक्के जरी आरक्षण दिलं तरी प्रत्येकाला शाश्वत करु शकतो असं नाही.”