प्रधानमंत्री पीक विमा योजना: शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

0

सोलापूर,दि.6: प्रधानमंत्री पीक विमा योजना: चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 असून अंतिम दिनांकापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस. गावसाने यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना | Pradhan Mantri Crop Insurance Scheme

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधसिूचित पिकांची सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी किंवा लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहील. स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या बाबींमध्ये विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देय राहिल. जोखिमेचा संरक्षण लाभ मिळण्यासाठी घटना घडताच 72 तासाच्या आत शेतकऱ्यांनी विमा कंपनीला,कृषी व महसूल विभागाला पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. काढणीपश्चात नुकसान भरपाई बाबींमध्ये शेतात पिकांची कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेली अधिसूचित पिके कापणीपासून जास्तीत-जास्त दोन आठवड्यापर्यंत गारपीट, वादळ, चक्रीवादळ व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येते. या नुकसानीची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.

सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंमलबजावणी करिता ओरियंटल इंन्सुरन्स कं.लि., मुंबई या विमा कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपूर्वी http://www.pmfby.gov.in व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज देणे आवश्यक आहे. कर्जदार योजनेत सहभागी होण्यास इच्छूक नसल्यास तसे विहित मुदतीत बँकेला लेखी कळविणे आवश्यक आहे.

जिल्हयात खरिप हंगाम 2023 मध्ये खरीप ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, मुग, कापूस उडीद, तूर, मका, व कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वसमावेशक पीक विमा योजनेंतर्गत शेतकरी हिस्स्याचा भार शेतकऱ्यांवर न ठेवता विमा हप्ता रक्कम या वर्षापासून राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे या वर्षापासून शेतकऱ्यांना केवळ ‘एक रुपया’ भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यातील खरीप पिकामध्ये भुईमुग -29 हजार रुपये, खरीप ज्वारी -25 हजा रुपये बाजरी -22 हजार, सोयाबीन -45 हजार, मूग-20 हजार रुपये, उडीद- 20 हजार रुपये,, तूर- 32 रुपये, कापूस- 23 हजार रुपये, मका- 6 हजार रुपये तर कांदा- 65 हजार रुपये या पिकांसाठी प्रति हेक्टरी क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे.

शेतक-यांनी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करावी. विमा योजनेत विमा घेतलेले पिक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक यामध्ये तफावतीचा आढळल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक आंतीम ग्राह्य धारले जाईल पिक विमा भरताना शेतक-यांनी आपल्या बँकेचा खाते क्र., पिकाखालील क्षेत्र, भुमापन क्रं मोबाईल क्रमांक आदी बाबतची खातरजमा करावी.

योजनेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस. गावसाने यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here