मुंबई,दि.20: शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात आज शेवटच्या टप्प्याचे (पाचवा टप्पा) मतदान पार पडत आहे. मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर जाणून बुजून विलंब लावला जात आहे. यामागे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अत्यंत नीच आणि घाणेरडा खेळ खेळला जातोय, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. या मागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मतदान केंद्रांवरील दिरंगाईवरून निवडणूक आयोगावर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
उध्दव ठाकरे म्हणाले, ‘संपूर्ण दिवसभर सकाळपासून मी विविध भागातील माहिती घेतोय. मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाला 10 ते 15 मसेजेस पाठवले जात आहेत. त्या प्रमाणे मतदार मतदानासाठी आले आहेत. खूप गर्दी दिसतेय. परंतु निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय, असं स्पष्ट दिसतंय. मतदारांमध्ये उत्साह आहे. पण निवडणूक आयोगात जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडून खूप दिरंगाई केली जात आहेत.’
‘विशिष्ट वस्त्या आहे तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासली जात आहेत. यामुळे जे ज्येष्ठ मतदार आहेत, त्यांना उन्हामुळे खूप त्रास झाला आहे. इतरही मतदारांना त्रास झाला आहे. कुठे कसलीही सोय नाही. पिण्याचं पाणी नाही. तरीही मतदार रांगा लावून उभे आहेत. हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय.’ असे उध्दव ठाकरे म्हणाले.
मतदारांना केले आवाहन
मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतोय. पक्षपातीपणा सुरू आहे. मतं नोंदवताना दप्तर दिरंगाई सुरू आहे. थोडा वेळ जारी राहिला असला तरी तुम्ही मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका, असं तमाम नागरिकांना माझं आवाहन आहे. मतदान केंद्रात जाऊन उभे राहा. जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत, त्यांना आज कितीही वाजले अगदी पहाटेचे पाच सहा वाजले तरी तरी सोडू नका. तुमचा मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका, असेही ठाकरे म्हणाले.
पोलिंग एजंटनाही सांगतो. जे मतदार मतदानासाठी जात आहेत, अशा कुठल्याही मतदान केंद्रामध्ये तुम्हाला मुद्दाम उशीर केला जातोय. त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा. तिथल्या निवडणूक प्रतिनिधींची नावंही तुम्ही विचारा. जेणे करून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायलायत दाद मागता येईल. उद्या त्यांची नावं माझ्याकडे आल्यावर पत्रकार परिषद घेऊन ती नाव आणि ठिकाणांसह माहितीच जाहीर करून टाकेन, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.








