Sanjay Raut vs Ajit Pawar: अजित पवारांच्या टीकेला संजय राऊत यांनी दिले उत्तर

0

मुंबई,दि.१८: Sanjay Raut vs Ajit Pawar: अजित पवारांच्या टीकेला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार संजय राऊतांना उद्देशून म्हणाले की, “तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्याबद्दल सांगा. ज्या पक्षाचं मुखपत्र आहे, त्याबाबत बोला. आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडण्यास खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र कोणी घेण्याचं कारण नाही. आमच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ते मग ते राष्ट्रीय किंवा राज्यातील स्तरावर मजबूत आहे.”

अजित पवार भाजपात जाणार, पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. परंतु या चर्चांना अजित पवार यांनी मंगळवारी (१८ एप्रिल) पूर्णविराम दिला. असल्या कुठल्याही बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच आपल्याबद्दल अफवा पसरवणाऱ्या नेत्यांचा अजित पवारांनी समाचार घेतला. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीदेखील अजित पवारांबाबत भाष्य केलं होतं. तसेच शिवसेनेच्या मुखपत्रातून यावर टिप्पणी केली होती.

Sanjay Raut vs Ajit Pawar: अजित पवारांच्या टीकेला संजय राऊत यांनी दिले उत्तर

अजित पवारांनी माझ्यावर टीका केली की नाही हे माहिती नाही. अजित पवारांच्या बदनामीची मोहिम सुरू झाली त्यावर आम्ही भूमिका मांडली. जेव्हा शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा शरद पवारांपासून, अजित पवारांपर्यंत सगळ्यांनी भूमिका घेतली होती. ती भूमिका आम्ही राष्ट्रवादीच्या बाबतीत घेतली त्यात चुकीचे काय अशा शब्दात संजय राऊतांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिले आहे. 

संजय राऊत म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत. महाविकास आघाडी टिकावी, राहावी आणि भक्कम व्हावी यासाठी आम्ही चौकीदारी करतो. त्यात अजित पवारसुद्धा आहेत. भाजपाची कारस्थाने रोज आमच्याविरोधात होतायेत ती उधळणे आमचे काम आहे. अजित पवारांबाबत ज्या अफवा पसरवण्यात आल्या त्याला पूर्णविराम मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या ऐक्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. मविआत संभ्रम आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करतायेत. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मविआला तडा जाणार नाही हे अजित पवार यांनी स्पष्ट आणि परखडपणे सांगितले असंही त्यांनी सांगितले. 

आम्ही महाविकास आघाडीची बाजू मांडतोय. म्हणून म्हटलं मी चौकीदार आहे. मविआचे रक्षण करणे हे आमचे काम आहे. उगाच फाटे फोडू शकत नाही. उदय सामंत पळपुटे आहेत. अजितदादा पळपुटे नाहीत. त्यांनी खंबीरपणे भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडी मजबूत आहे. जे पार्श्वभागाला पाय लावून पळालेल्यांनी मविआची चिंता करू नये. आपण माती खाल्ली इतर माती खाणार नाही असा टोलाही संजय राऊत यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपा नेत्यांना लगावला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here