मुंबई,दि.28: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ठाकरे गटाबाबत मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर पूर्वी विधानसभा निवडणूक होणार आहेत. सर्वच राजकीय पक्ष याची तयारी करत आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत होणार आहे. महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) तर महायुतीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) या प्रमुख पक्षांचा समावेश आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा | Prakash Ambedkar
अशातच संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी एकत्रित येत परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या तिसऱ्या आघाडीत सामील होऊ शकतात, अशा चर्चा आहेत. यातच ठाकरे गटाला महाविकास आघाडीत 44 जागा मिळतील, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला. विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी काँग्रेस 150 जागांच्या खाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 88 जागांच्या खाली यायचे नाही असे ठरवत आहे. त्यामुळे आपण जर या दोन्ही पक्षाच्या जागांच्या मागणीचा विचार केला तर शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त 44 जागा मिळतील. एवढ्या जागा ठाकरे गटाला सोडायला ते तयार असल्याची परिस्थिती आहे. आता हा फॉर्म्युला समोर येत असल्यामुळे यावरून आणखी राजकारण होईल. काही ओबीसींच्या नेत्यांनी सांगितले की, सर्वांत मोठा पेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर असणार आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.








