मुंबई,दि.5: Jitendra Awhad On Gopinath Munde: राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा किस्सा सांगितला आहे. ‘मी मरेपर्यंत शरद पवारसाहेबांसोबत राहणार आहे. काय मिळतं, काय मिळत नाही, महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना माहित आहे की, जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांसाठी काय करतो? मला सांगायचे नव्हते तरीही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) काय करु शकतो, हे अमीत नांदगावकरला विचारा! त्याच्यातील सद्सद्विवेकबुद्धी जीवंत असले तर कदाचित तोच तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतो, असं म्हणत आव्हाड यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
एकनाथ शिंदे गटाने ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाकडून जोरदार फोडाफोडी सुरू आहे. तब्बल 22 नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागले आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले | Jitendra Awhad On Gopinath Munde
‘मी साधारण 1987 साली माझे भाग्यविधाते आदरणीय पवार साहेब यांच्या संपर्कात आलो अन् माझ्या राजकीय कारकिर्दीला खर्या अर्थाने सुरुवात झाली. तसे पाहता कॉलेजची निवडणूक मी 1981 सालीच लढलो होतो. तेव्हापासूनच माझा छोट्या-छोट्या राजकीय चळवळींमध्ये माझा सहभागी होत होता. असाच काळ पुढे जात राहिला. मी शिक्षण मंडळाचा अध्यक्ष झालो.आई वारली.. आई वारल्यानंतर अवघे अकरा दिवस उलटले असतील तोच एका खोट्या गुन्ह्यात मला गोवण्यात आले आणि असे दाखविण्यात आले की, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीच मला यात गोवले आहे. सहा महिन्यांनी मी माझ्या सासर्यांसमवेत दिवंगत गोपिनाथ मुंडेसाहेबांना भेटलो.
त्यानंतर जे झाले ते अचंबित करणारे होते… | Jitendra Awhad
त्यावेळी त्यांनी मला विचारले की, ‘तू आधी का नाही आला?’ त्यावर मी घाबरत-घाबरत म्हटले की, लोकं सांगत होती की तुम्हीच मला या प्रकरणात गोवले आहे. यावर ते हसू लागले. त्यांनी माझ्या समोरच माझ्या केसची फाईल मागवून घेतली. त्यांचे विश्वासू सचिव अण्णासाहेब मिसाळ यांना त्या फाईलचा अभ्यास करायला सांगितला. त्यानंतर जे झाले ते अचंबित करणारे होते. ज्यांनी- ज्यांनी या फाईलमध्ये सह्या केल्या होत्या. त्या सर्वांना बोलावून धारेवर धरले. अन्, “या पोराचे आयुष्य उद्ध्वस्त करायला किती पैसे घेतले होते? ही केस रद्द करा”, असे आदेश दिले.
अशीच लढत पुढे होतच राहिली. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. त्यानंतरच्या दोन घटना मी प्रथमच सांगत आहे.
मला काय ते एक-दोन तासात कळव…
एका दिवशी सकाळी सात वाजता मला फोन आला, “मी गोपीनाथ मुंडे बोलतोय! मी आदबीने- आदराने हॅलो सर, बोला; असे म्हणत फोन घेतला. त्यावर ते म्हणाले की, मी आणि प्रमोदने ( स्व. प्रमोद महाजनसाहेब) रात्री चर्चा केली आहे. तुला भाजपतर्फे आमदार करायचा आम्हा दोघांचेही ठरले आहे. संध्याकाळी प्रमोद बाळासाहेबांशी बोलणार आहे. पण, तू घरी चर्चा करुन, मला काय ते एक-दोन तासात कळव.” मी माझ्या पत्नीशी चर्चा केली. पत्नीला सांगितले की, तूच त्यांना सांग की तो काय शरद पवारसाहेबांना सोडणार नाही. त्याला काही मिळाले, नाही मिळाले तरी चालेल; आणि तो काय हे तुम्हाला सांगू शकणार नाही. कारण, तुमचे त्याच्यावर उपकार आहेत.
ते हसायला लागले अन् म्हणाले, नाही, त्याच्यात टॅलेंट आहे. त्याचे हे टॅलेंट वाया जाऊ नये, म्हणून माझा विचार होता की त्याला आमदारकीची संधी द्यावी. पण, ठिक आहे, तुमच्या घरातला निर्णय आहे. तो तुम्हाला वाटत असेल योग्य आहे. तर माझे काही म्हणणे नाही, असे म्हणत फोन ठेवला. पण, त्यानंतर त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी कधीच माझ्यावर राग ठेवला नाही. जेव्हा-जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा खांद्यावर हात ठेवून बाजूला घेऊन जाणे; गप्पा मारणे! ठाण्यात जरी त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम असला तरी एकटेच माझ्या घरी येणे, माझ्यासोबत जेवायला बसणे, हे सर्व त्यांनी केले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता, अशा आठवणींना उजाळा आव्हाडांनी दिला.
स्व. दिघेसाहेब गेल्यानंतर रघुनाथ मोरेसाहेब हे जिल्हाप्रमुख झाले. त्यांचाही अपघात झाला. त्याच काळात आमच्या संघर्ष संस्थेच्या ऑफिसमध्ये देवीदास चाळके बसले होते. फोनची रिंग वाजली आणि मिलींद नार्वेकर बोलतोय, असा समोरुन आवाज आला. त्याने बोलायला सुरवात केली. ‘जितेंद्र, उद्धवसाहेबांचे म्हणणे आहे , आग्रहाचे सांगणे आहे की शिवसेनेचा जिल्हाप्रमुख हो. तुझ्या संपूर्ण राजकीय प्रवासाची जबाबदारी आमची! मातोश्रीशी निष्ठावान राहिल असा कोणीतरी जिल्हाप्रमुख आम्हाला करायचा आहे. तू विचार करुन सांग! मिलींद माझा मित्र असल्याने मी त्याला म्हटले, विचार करण्यासारखं त्याच्यात काहीच नाही. मी पवारसाहेबांना सोडणार नाही. तुम्ही माझा एवढा विचार केलात. त्याबद्दल मी आभारी आहे. त्यानंतर काय घटना घडल्या त्या मला सांगायच्या नाहीत. ह्या सगळ्याचे जीवंत साक्षीदार हे देविदास चाळके आहेत. त्यानंतर अनेक ठिकाणी अनेकवेळा असे घडत गेले. राजकीय प्रवास माझा सुरुच राहिला.
‘2014 साली पवारसाहेबांनी मला मंत्री केले. 2019 सालीही मंत्री केले. अन् सर्वात महत्वाचे म्हणजे, जेव्हा जेव्हा माझ्यावर राजकीय संकट आलं; मी राजकीयदृष्ट्या अडचणीत आलो. तेव्हा मागे कायम उभा ते कायम उभे राहिले , त्याचे नाव पवारसाहेब! त्यामुळे काय मिळाले आणि काय मिळाले नाही, याच्या हिशोबावर निष्ठा ठरत नसतात. तुम्हाला ज्यांनी घडविले, तुम्हाला घडवत असताना तुम्ही कसे होतात? घडल्यावर तुम्ही कसे आहात, याचा विचार माणसाने स्वत:हूनच करायला हवाय. स्वतःला भाव लावून विकणाऱ्यांची किळस येते, असं म्हणत आव्हाडांनी शिंदे गटात जाणाऱ्या नगरसेवकांना निशाणा साधला.
‘मी मरेपर्यंत शरद पवारसाहेबांसोबत राहणार आहे. काय मिळतं, काय मिळत नाही, महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना माहित आहे की, जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांसाठी काय करतो? मला सांगायचे नव्हते तरीही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर जितेंद्र आव्हाड काय करु शकतो, हे अमीत नांदगावकरला विचारा! त्याच्यातील सद्सद्विवेकबुद्धी जीवंत असले तर कदाचित तोच तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतो, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.