Amol Mitkari On Ajit Pawar: अजित पवारांच्या नाराजीबाबत आमदार अमोल मिटकरी यांचे मोठे विधान

0

मुंबई,दि.18: Amol Mitkari On Ajit Pawar: अजित पवारांच्या नाराजीबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी मोठे विधान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतील, असंही बोललं जात होतं. पण यावर आता स्वत: अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. मी बंडखोरी करणार असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार, असं विधान अजित पवारांनी केलं.

काय म्हणाले आमदार अमोल मिटकरी? | Amol Mitkari On Ajit Pawar

अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. “2019 साली महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी ज्याप्रकारे पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग केला होता, त्याच प्रकारे शिंदे गटाच्या नेत्यांच्या मनातील मळमळ बाहेर काढण्यासाठी हा प्रयोग होता, असं समजा…” असं विधान अमोल मिटकरी यांनी केलं. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

“अजित पवारांनी भाजपाला पाठिंबा दिला, तर त्यांचं स्वागत करू” या शिंदे गटाच्या आमदारांच्या भूमिकेबाबत विचारलं असता अमोल मिटकरी म्हणाले, “शिंदे गटाचे आमदार हे दुतोंडी साप आहेत. अजित पवार निधी देत नव्हते, म्हणून आम्ही भाजपाबरोबर गेलो, असं त्यांनीच म्हटलं होता. यामध्ये शहाजीबापू पाटील, संजय शिरसाट, संतोष बांगर हेच लोक होते. उद्धव ठाकरे जेव्हा आमच्याबरोबर आले, तेव्हाही याच लोकांनी तोंडसुख घेतलं होतं. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी प्रतारणा करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, असं त्यांनी म्हटलं होतं. पण आता त्यांची थोबाडं का बंद झाली? आता अजित पवार त्यांच्याकडे जातायत, तर त्यांना गुदगुल्या झाल्या.”

“ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका शिंदे गटाविरोधात होती किंवा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीबरोबर आले. तेव्हा शिंदे गटाच्या आमदारांना आग लागली होती. त्यामुळे हे दुतोंडी सापासारखे आहेत. या वाचाळवीरांकडे आता कुणाचंही लक्ष राहिलं नाही. त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात यांनी नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये. यांना जनता जागा दाखवेल. अजित पवारांवर तोंडसुख घेणाऱ्यांचे थोडेच दिवस उरले आहेत” असंही अमोल मिटकरी म्हणाले.

“अजित पवार निधी देत नाहीत, म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो” शिंदे गटाच्या दाव्याबद्दल विचारलं असता अमोल मिटकरी पुढे म्हणाले, “संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, अजित पवार आमच्याकडे आले तर त्यांचं स्वागत आहे. शरद पवार आता थकलेले आहेत. आहो, शिरसाट मला एक सांगा, ज्या अजित पवारांवर तुम्ही किंवा शहाजीबापू पाटील सारख्या लोकांनी आरोप केला की, ते निधी देत नाहीत. आता तो आरोप मावळला का? जनता दूधखुळी नाहीये.”

जसं राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी… | Amol Mitkari

“मी एकच सांगू इच्छितो की, जसं राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पहाटेचा शपथविधी घेतला होता, तोच धागा धरून सांगतोय की, शिंदे गटातील गद्दारांच्या मनातील मळमळ बाहेर काढायला, आमचा हा प्रयोग होता, असं समजण्यास काहीही हरकत नाही,” असं मोठं विधान अमोल मिटकरी यांनी केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here